England in the quarter finals win over Senegal brilliance of Harry Kane ysh 95 | Loksatta

FIFA World Cup 2022 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत; सेनेगलवर ३-० अशी मात; हॅरी केनची चमक

खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने सेनेगलचा ३-० असा पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

FIFA World Cup 2022 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत; सेनेगलवर ३-० अशी मात; हॅरी केनची चमक
हॅरी केन

एपी, अल बायत : खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने सेनेगलचा ३-० असा पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पूर्वार्धात ३८व्या मिनिटाला जॉर्डन हेंडरसन, हॅरी केन (४५+३ मिनिटाला)आणि उत्तरार्धात ५७व्या मिनिटाला बुकायो साका यांनी गोल केले. पूर्वार्धात सुरुवातीच्या काही मिनिटांत केलेल्या आक्रमणाचाच दिलासा सेनेगलला मिळाला. सेनेगलची ही आक्रमणे निश्चित इंग्लंडची चिंता वाढवणारी होती. मात्र, त्याचा फायदा सेनेगलच्या खेळाडूंना उठवता आला नाही.

सामन्याच्या उत्तरार्धात सुरुवातीच्या काही मिनिटांतच साकाने इंग्लंडची आघाडी भक्कम करणारा गोल केला. यानंतर सेनेगलला इंग्लंडचा बचाव भेदता आला नाही. इंग्लंडने विजयावर शिक्कामोर्तब करताना उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सविरुद्धची आपली भेट निश्चित केली. इंग्लंडची सुरुवात संथ होती. खेळाडू स्थिरावण्यापूर्वीच सेनेगलच्या खेळाडूंनी आक्रमक सुरुवात केली. इंग्लंडच्या बचावफळीला सुरुवातीच्या काळात गाफील राहणे चांगलेच महागात पडले. केवळ गोलरक्षक उभा राहिल्यामुळे इंग्लंडला दोन्ही वेळा गोल रोखण्यात यश आले. त्यानंतर मात्र इंग्लंडने अभावानेच सेनेगलला वर्चस्व मिळविण्याची संधी दिली. पूर्वार्धातील अखेरच्या दहा मिनिटांत तर, इंग्लंडचा खेळ त्यांचा दर्जा सिद्ध करणारा होता. बेलिंगहॅमच्या पासवर इंग्लंडचे दोन्ही गोल साकार झाले. प्रथम हेंडरसन, तर भरपाई वेळेत कर्णधार हॅरी केनने गोल केला.

रहीम स्टर्लिगची विश्वचषकातून माघार?

दोहा : इंग्लंडच्या रहीम स्टर्लिगची विश्वचषक मोहीम अर्धवट राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक अडचणींमुळे स्टर्लिगला मायदेशी परतावे लागणार आहे. इंग्लंड फुटबॉल संघटनेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्टर्लिग फ्रान्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी उपलब्ध होणार नाही. लंडनच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी रात्री सशस्त्र घुसखोरांनी लंडन येथील स्टर्लिगचे घर फोडले. त्यावेळी त्याचे कुटुंबीय घरातच होते. हा प्रसंगच असा आहे, की त्याने कुटुंबाबरोबर राहणे आवश्यक आहे. आम्ही त्याला पाठिंबा देणार आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही त्याला आवश्यक तेवढा वेळ देऊ, असे प्रशिक्षक साऊथगेट म्हणाले.

  • एका विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे १२ गोल झाले असून त्यांनी २०१८ मधील आपल्याच कामगिरीशी बरोबरी साधली आहे. 
  • इंग्लंड संघ दहाव्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST
Next Story
T-20 World Cup: शफाली युवा महिला संघाची कर्णधार