इंग्लंडच्या केशव गुप्ताने उलगडले ऋणानुबंध
मी खरं तर भारतीय वंशाचा, पण भारतामध्ये सध्या आमचे कुटुंब नाही. आम्ही इंग्लंडमध्ये स्थायिक झालो आहोत. पण आजी-आजोबांच्या बोलण्यातून नेहमीच भारताचा उल्लेख येतो. यापूर्वी भारतात जास्त येण्याची संधी मिळाली नव्हती, पण कबड्डी विश्वचषकामुळे माझे भारताशी पुन्हा एकदा नाते जुळले, असे इंग्लंडचा कबड्डीपटू केशव गुप्ता सांगत होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या सामन्यात केशवने चमकदार कामगिरी केली होती. त्याने एकूण १२ चढाई केल्या. यामध्ये तो आठ वेळा यशस्वी ठरला होता. त्याचबरोबर त्याने दोन बोनस गुणही पटकावले होते. या सामन्यात त्याने ‘सुपर-१०’ची कमाई करत एकूण १४ गुण संघाला मिळवून दिले होते.
‘मी बास्केटबॉल, हॉकीसारखे बरेच खेळ खेळतो, पण यामध्ये मला कबड्डी सर्वात जास्त आवडतो. कारण या खेळात क्षणार्धात पारडे बदलू शकते. हा खेळ तुम्हाला काही क्षणांमध्ये आक्रमण आणि बचाव या दोन्ही गोष्टी शिकवतो. एकदा चढाई झाल्यावर मिनिटभरात तुम्हाला बचाव करायचा असतो. त्यामुळे तुम्हाला चपळ असावे लागते. या चपळाईने मला खेळाकडे आकर्षिक केले,’ असे केशवने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘माझे बाबा पंजाबचे तर आई गुजरातची. त्यामुळे घरामध्ये भारताचे एक चांगले ‘फ्युजन’ पाहायला मिळते. या दोन्ही राज्यांचे संस्कार माझ्यावर आहेत. आता कबड्डीबद्दल मी आजोबांना सांगितले तेव्हा त्यांनीही गतआठवणींना उजाळा दिला. कबड्डी माझ्यासाठी फक्त खेळ नाही, तर त्यापेक्षा बरेच काही आहे.’
कबड्डीचा व्हाट्सअॅप गट
इंग्लंडमध्ये कबड्डीचा एवढा प्रसार झाला आहे की, त्याचे व्हॉट्सअॅपवर गटही तयार झाले आहेत. सुरुवातीला या ग्रुपमध्ये फक्त ४-५ व्यक्ती होत्या, पण आता गटाने जवळपास अर्धशतक पूर्ण केले आहे, असे केशव सांगतो.
विद्यापीठामध्ये कबड्डीचा तास
इंग्लंडमध्ये जसे बरेच विषय शिकवले जातात, तसेच कबड्डीही. यामध्ये कबड्डीचाही एक तास असतो. त्यामध्ये कबड्डीबद्दलची माहिती दिली जाते. त्यामुळे हा खेळ समजायला मदत होत आहे, असे त्याने सांगितले.
महिलांचाही संघ
इंग्लंडमध्ये आता फक्त पुरुषांचाच संघ नाही, तर महिलाही या खेळात सामील झाल्या आहेत. वेगवेगळ्या क्लब्जमध्ये महिलांच्या कबड्डीचे संघ आहे. त्यांना मोठे व्यासपीठ मिळाल्यास महिला कबड्डीही मोठी होऊ शकेल.
राहुल चौधरी आदर्शवत
भारताचा राहुल चौधरी माझ्यासाठी आदर्शवत आहे. या कबड्डी विश्वचषकाच्या निमित्ताने मला त्याची भेट घेता आली. मला त्याच्याशी संवाद साधता आला. कबड्डीमधले चार मौलिक सल्ले त्याने मला दिले.