तीन दिवसांच्या रंजकतेने भरलेल्या खेळानंतरही चौथ्या दिवशी यजमान मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांना विजयाची समान संधी असून सामना दोलायमान अवस्थेत आहे. एकीकडे मुंबईला जिंकण्यासाठी नऊ विकेट्सची गरज आहे, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर संघाला १७८ धावांची गरज आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर मुंबईने सामन्यात आघाडी घेतली होती. पण अन्य कुचकामी फलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नाही. तिसऱ्या दिवशीही चहापानाने पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा घात केला. पहिल्या दिवशी चहापानाच्या वेळी मुंबई आणि दुसऱ्या दिवशी जम्मू आणि काश्मीरचा संघ सर्व बाद झाला. तिसऱ्या दिवशी चहापानानंतर अतिरिक्त वेळेत मुंबईच्या संघाचा दुसरा डाव आटोपला.
पहिल्या सत्रात सूर्यकुमार आणि धवल कुलकर्णी यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रामध्ये विकेट मिळवण्याची एकही संधी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांना दिली नाही. उपहारापर्यंत या दोघांनी खडूस फलंदाजीचा नमुना पेश करत १७७ धावांपर्यंत मजल मारली. उपहारानंतर स्क्वेअर लेगला चौकार ठोकत सूर्यकुमारने शतक झळकावले, मुंबईने दोनशे धावांचा पल्लाही गाठला. पण त्यानंतर मात्र ही जोडी फुटल्यावर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे मुंबईचा डाव कोसळला. उमर नझीरने या दोघांनाही एका धावेच्या अंतरावर तंबूत धाडत मुंबईला दुहेरी धक्का दिला. धवल कुलकर्णीने नाइट वॉचमनची भूमिका चोख बजावत २०४ मिनिटांमध्ये १४८ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकार खेचत ३७ धावा फटकावल्या. सूर्यकुमार तिसऱ्या दिवशी चांगलाच तळपला. त्याने १८ चौकारांच्या जोरावर ११५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १५२ धावांची अमूल्य भागीदारी रचली. हे दोघे बाद झाल्यावर ३२ धावांमध्ये मुंबईने तीन फलंदाज गमावले. त्यानंतर वासिम जाफर फलंदाजीला येणार की नाही याची उत्सुकता होता. पण जखमी शेर वासिम फ्रॅक्चर होऊनही फलंदाजीला उतरला. पॉइंटला चौकार मारत त्याने सुरेख सुरुवात केली. पण विशाल दाभोळकरला राम दयालने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल बाद करत मुंबईचा डाव २५४ धावांमध्ये संपुष्टात आणला.
विजयासाठी २३७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या जम्मू आणि काश्मीर संघाची सुरुवात चांगली झाली नसली, तरी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या शुभम खजुरियाने ५ चौकार आणि एक षटकार ठोकत संघाला अर्धशतक गाठून दिले. तिसऱ्या दिवसअखेर जम्मू आणि काश्मीर संघाची १ बाद ५८ अशी स्थिती आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : २३६ आणि २५४ (सूर्यकुमार यादव ११५, धवल कुलकर्णी ३७; राम दयाल ५/७६, उमर नझीर ४/४९) वि. जम्मू आणि काश्मीर : २५४ आणि २० षटकांमध्ये १ बाद ५८ (शुभम खजुरिया खेळत आहे ३४; शार्दुल ठाकूर १/२०).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Equal opportunity for mumbai and jammu and kashmir to win ranji match
First published on: 10-12-2014 at 01:05 IST