बर्लिन : सलग दुसऱ्यांदा युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यास प्रयत्नशील असलेल्या इंग्लंड संघासमोर आज, गुरुवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेदरलँड्सचे आव्हान असेल. नेदरलँड्सला नमवायचे झाल्यास इंग्लंड संघाला कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे.

इंग्लंड संघावर आतापर्यंत रटाळ खेळ करण्यावरून टीका सुरू आहे, तर नेदरलँड्स संघानेही कायम पिछाडीनंतर सामन्यात मुसंडी मारली आहे. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत न्यायचा नसेल, तर इंग्लंडच्या हॅरी केन आणि ज्युड बेलिंगहॅम, तर नेदरलँड्सच्या मेम्फिस डिपे आणि कोडी गाकपो या प्रमुख खेळाडूंना गोल करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा >>> मोठी बातमी! गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात दोन्ही संघांना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. केन आणि डिपे हे प्रतिस्पर्धी संघांतील सर्वांत अनुभवी खेळाडू आहेत. तसेच गोलच्या बाबतीतही हे दोघे आघाडीवर आहेत. केनच्या नावे ९६ सामन्यांत ६५, तर डिपेच्या नावे ९७ सामन्यांत ४६ गोल आहेत. मात्र, युरो स्पर्धेत दोघांनाही चमक दाखवता आलेली नाही. केनने दोन, तर डिपेने केवळ एकच गोल केला आहे. त्यामुळे त्यांनी कामगिरी उंचावणे आवश्यक आहे.

उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीच्या दोन्ही सामन्यांत इंग्लंड व नेदरलँड्स संघांना पिछाडी भरून काढावी लागली होती. इंग्लंडसाठी एकदा बेलिंगहॅम, तर एकदा बुकायो साका धावून आला, तर नेदरलँड्ससाठी गाकपो तारणहार ठरला आहे. फरक इतकाच की, पिछाडीनंतरही इंग्लंडच्या खेळात संथपणाच दिसून आला, तर नेदरलँड्सने आपला खेळ कमालीचा उंचावला.

केनबाबत संभ्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपांत्यपूर्व फेरीत अगदी अखेरच्या क्षणी हॅरी केन पायात गोळे आल्यामुळे मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम आहे. मात्र, उपांत्य फेरीतील सामन्याचे महत्त्व लक्षात घेता केन सुरुवातीपासून खेळण्याची अपेक्षा आहे. केन पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांच्याकडे आयव्हन टोनीला खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

● वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

● थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २, , सोनी लिव्ह अॅप