यूरो कप २०२० स्पर्धेत इंग्लंडने विजयी सलामी दिली आहे. क्रोएशिचा १-० ने पराभव करत ड गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. पहिल्या सत्रात दोन्हीही संघांना गोल करण्यात यश आलं नाही. मात्र इंग्लंडने दुसऱ्या सत्रात आपला आक्रमक बाणा कायम ठेवत क्रोएशियावर दडपण निर्णाण केलं. अखेर मॅचच्या ५७ व्या मिनिटाला रहिम स्टरलिंगने गोल केला आणि विजयाचा मार्ग सुकर केला. शेवटच्या मिनिटांपर्यंत क्रोएशियाचे खेळाडू गोल करण्यासाठी झगडताना दिसले. मात्र सामन्यात बरोबरी साधण्याची क्रोएशियाच्या खेळाडूंची धडपड वाया गेली. त्यांना गोल करण्यात अपयश आलं. या पराभवासह ड गटातील गुणतालिकेत क्रोएशियाचा संघ चौथ्या स्थानावर गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरं सत्र

यूरो कप २०२० स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया सामन्यातील दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा आक्रमकपणा दिसून आला. इंग्लंडनं क्रोएशियावर १ गोलने आघाडी घेतली. ५७ व्या मिनिटावर इंग्लंडच्या रहिम स्टेरलिंग याने गोल केला आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. यामुळे क्रोएशियाच्या संघावर दडपण आलं आहे. आता सामन्यात बरोबरी साधण्यासाठी क्रोएशियाचे खेळाडू धडपड करताना दिसले. दरम्यान, दुसऱ्या सत्रात क्रोएशियाच्या २ तर इंग्लंडच्या एका खेळाडूला मैदानात गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं आहे.

पहिलं सत्र

पहिल्या सत्रात इंग्लंड आणि क्रोएशिया संघाला एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघाना गोल करण्याच्या काही संधी चालून आल्या होत्या. मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यास दोन्ही संघांना अपयश आलं. पहिल्या सत्रात इंग्लंडचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. जास्तीत जास्त वेळा फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवत त्यांनी क्रोएशिया संघाची दमछाक केली. मात्र चिवट क्रोएशियाने देखील इंग्लंडला एकही गोल करू दिला नाही. इंग्लंडला २ फॉल्स तर क्रोएशियाला १ फॉल्स मिळाला. इंग्लंडला एकदा पॅनल्टी कॉर्नरही मिळाला. मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात इंग्लंडला अपयश आलं. दोन्ही संघांना प्रत्येकी एकदा गोल करण्याची संधी आली होती. मात्र ती संधी हुकली. मैदानात गैरवर्तन केल्याने क्रोएशियाच्या डुज कॅलेटा कार याला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं आहे.

लंडनमधील वेम्बली मैदानात हा सामना झाला. गट ‘ड’मधील हा पहिला सामना असून स्पर्धेतील पाचवा सामना होता. इंग्लंडचा संघ सलग ६ सामने जिंकत या स्पर्धेत पोहोचला आहे. गेल्याच आठवड्यात इंग्लंडने रोमानियावर विजय मिळवला होता. असं असलं तरी क्रोएशियाचं तगडं आव्हान इंग्लंडसमोर होतं. २०१८ च्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत केलं होतं. त्यानंतर नेशंस कपमध्ये इंग्लंडने क्रोएशियाला पराभूत करत वचपा काढला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंडने बाजी मारली आहे.

इंग्लंड आणि क्रोएशिया सघाने मैदानात खेळणारे अकरा जणांचा संघ आणि राखीव खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे. इंग्लंडने सामन्यासाठी ४-२-३-१ अशी व्यूहरचना आखली आहे. तर क्रोएशियाने ४-३-३ अशी व्यूहरचना आखली आहे.

इंग्लंड आणि क्रोएशिया सामन्यात करोनामुळे मोजक्या प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Euro cup 2020 football fight between england and croatia match live rmt
First published on: 13-06-2021 at 17:46 IST