दक्षिण आफ्रिकेचा संघनायक ए बी डी’व्हिलियर्सने पायाच्या दुखापतीची तमा न बाळगता ६१ चेंडूंत ११९ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. परंतु डी’व्हिलियर्सने मात्र फॅफ डू प्लेसिसने साकारलेली शतकी खेळी तिघांपैकी सर्वोत्तम असल्याचे नमूद केले.
‘‘फॅफ आपल्या खेळीला पुरेसे योगदान देत नाही. कठीण परिस्थितीतून त्याने भारतीय फिरकी गोलंदाजांचे नियंत्रण भेदले. त्याने आपली खेळी उत्तमरीत्या साकारली. त्यामुळे क्विंटनला आणि मला मोकळेपणाने खेळता आले. फॅफने एका टोकाने स्थर्य दिल्यामुळे आम्हाला वेगाने धावा काढता आल्या,’’ असे डी’व्हिलियर्सने सांगितले. वानखेडेवरील सामन्याचे वर्णन करताना डी’व्हिलियर्स म्हणाला, ‘‘हा माझ्या कारकीर्दीतील आणि नेतृत्वाखालील एक संस्मरणीय सामना ठरेल. सर्वोच्च धावसंख्येचे शिखर या सामन्यात साद घालत होते. फलंदाजी आणि गोलंदाजीचा हा परिपूर्ण सामना होता. मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान वाटतो.’’