Vaibhav Suryavanshi News: भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आलं आहे. १४ वर्षीय वैभव पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये गेला आहे. पहिल्याच दौऱ्यावर त्याचा दरारा पाहायला मिळाला आहे. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघाविरूद्ध झालेल्या युथ वनडे मालिकेत भारतीय संघाला ३-२ ने विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या मालिकेत त्याने वेगवान शतक झळकावलं. दरम्यान वैभवचा चाहतावर्ग हा दिवसेंदिवस वाढत आहे. इंग्लंडमध्ये त्याला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली किंवा त्यापेक्षा मोठ्या लेव्हलचा खेळाडू असल्याचंही म्हटलं जात आहे.
वैभवने भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. त्याची ही कामगिरी पाहता राजस्थान रॉयल्सने त्याला ट्रायल्ससाठी बोलवलं. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १.१० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. यादरम्यान त्याने षटकार मारून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली. गुजरात टायटन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३५ चेंडूत शतकी खेळी केली होती. यासह तो आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला होता. तसेच सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने युसूफ पठाणलाही मागे सोडलं होतं. या खेळीनंतर वैभव सूर्यवंशी तुफान चर्चेत आला.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे स्टेटिस्टियन आणि क्रिकेट विश्लेषकांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान त्याला पहिल्यांदा खेळताना पाहिलं. खूप फोटो काढले गेले. पत्रकारांनी गर्दी केली होती. इतकेच नव्हे, तर बीबीसीमधूनही काही लोकं त्याला खेळताना पाहण्यासाठी उपस्थित होते.”
तसेच ते पुढे म्हणाले,”मला माहीत होतं, मी एका स्टार खेळाडूला खेळताना पाहत आहे. त्याने ४० षटकांच्या सामन्यात ३१ चेंडूंचा सामना करून ८६ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ९ षटकार मारले होते. त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुल शॉट मारल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं होतं”
इंग्लंडमध्ये वैभवची क्रेझ
तसेच ते पुढे म्हणाले की, “सामन्यादरम्यान मी जितक्या लोकांशी संवाद साधला, ते हेच म्हणत होते की आम्ही भविष्यातील स्टार खेळाडूला घडताना पाहत आहोत. मी आतापर्यंत कुठल्याही खेळात जितके १४ वर्षीय खेळाडू पाहिले, त्यात वैभव सर्वोत्कृष्ट आहे. इंग्लंडमध्ये त्याला खेळताना पाहताना लोकं हेच म्हणतात की, आम्ही एका खास खेळाडूला खेळताना पाहत आहोत. त्याच्याकडून सचिन तेंडुलकर आणि कोहलीच्या लेव्हलची अपेक्षा आहे किंवा त्याहूनही अधिक.”