scorecardresearch

Premium

World Cup Cricket : पेटलेलं इडन गार्डन्स आणि ओक्साबोक्शी रडणारा विनोद कांबळी

भारताचा पराभव दिसू लागताच चाहत्यांनी मैदानात आग लावली आणि खेळाडूंच्या दिशेने बाटल्या भिरकवायला सुरुवात केली.

vinod kambali crying at eden gardens
इडन गार्डन्सवर विनोद कांबळी ढसाढसा रडला (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

१३ मार्च १९९६ हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला काळा दिवस मानला जातो. खेळात हारजीत होत असते. पण यादिवशी भारतीय संघाच्या सुमार कामगिरीमुळे चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. वर्ल्डकप सेमीफायनच्या मुकाबल्यात प्रतिस्पर्धी श्रीलंका संघाला विजयी घोषित करण्यात आलं.

कोलकाताचं इडन गार्डन्सचं भव्य मैदान. लाखभर चाहत्यांना सामावून घेण्याची क्षमता असलेलं. बंगाली क्रिकेटरसिक भावनाप्रधान समजले जातात. क्रिकेटवर निस्सीम प्रेम ही त्यांच्या प्रेमाची खासियत. भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फ्लडलाईट्सच्या प्रकाशात दवाची शक्यता असताना धावांचा पाठलाग करूया असा विचार होता. पण समोर श्रीलंकेचा संघ होता. श्रीलंकेची सुरुवात २/१ अशी होती. धडाकेबाज जोडी सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथरना जवागल श्रीनाथसमोर हतबल ठरले. असंका गुरुसिन्हाही झटपट माघारी परतला. पण यानंतर अरविंद डिसिल्व्हा आणि रोशन महानामा यांनी यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. ४७ चेंडूत १४ चौकारांसह ६६ धावांची खेळी करुन अरविंदा तंबूत परतला. कर्णधार अर्जुन रणतुंगाने महानामाला साथ दिली. ४२ चेंडूत ३५ धावा करुन रणतुंगा बाद झाला. दुखापतीमुळे महानामाला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्याने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हशन तिलकरत्नेने ३२ तर चामिंडा वासने २३ धावांच्या छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. श्रीलंकेने ५० षटकात २५१ धावांची मजल मारली. भारताकडून जवागल श्रीनाथने ३ तर सचिन तेंडुलकरने २ विकेट्स पटकावल्या.

World Cup 2023: In Hyderabad Pakistani cricketers ate biryani took selfies with fans watch the video
Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video
World Cup 2023: Ashwin's duplicate rejects the offer Kangaroos who is Mahesh Pithiya refused to train with Australia
World Cup 2023: अश्विनच्या डुप्लिकेटने कांगारूंच्या मनसुब्यांवर फिरवले पाणी, कोण आहे ‘हा’ खेळाडू ज्याने ऑस्ट्रेलियाबरोबर सरावास दिला नकार?
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
Kuldeep Yadav Brutally Trolled For Going To Bageshwar Dham Dheerendra Shastri Netizens Slam Asia Cup 2023 IND vs PAK Star
“कुलदीप यादवचं नशीब चमकतंय कारण..”, धीरेंद्र शास्त्रींबरोबरचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांची सडकून टीका

आणखी वाचा: Cricket World Cup: जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेत खेळायला नकार दिला होता

या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने नवज्योत सिंग सिद्धूला लगेचच गमावलं. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि संजय मांजरेकर यांनी चिवट भागीदारी केली. १ बाद ९८ असा भारतीय संघ सुस्थितीत होता. जयसूर्याच्या फिरकीसमोर तेंडुलकर स्टंपिंग झाला. त्याने ९ चौकारांसह ६५ धावांची दमदार खेळी केली. सचिन माघारी परतला आणि भारतीय खेळाडूंचं अवसानच गेलं. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन भोपळाही न फोडता तंबूत परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मांजरेकरला जयसूर्याने त्रिफळाचीत केलं. बढती मिळालेला श्रीनाथ धावचीत होऊन परतला. फिनिशर म्हणून प्रसिद्ध अजय जडेजालाही भोपळा फोडता आला नाही. विकेटकीपर फलंदाज नयन मोंगिया आणि आशिष कपूरही माघारी आले. ९८/१ अशा स्थितीतून भारताची अवस्था १२०/८ अशी झाली.

पराभव दिसू लागताच इडन गार्डन्समधील चाहते भडकले आणि त्यांनी मैदानात आग लावली. काहींनी खेळाडूंच्या दिशेने बाटल्या भिरकवायला सुरुवात केली. सामना सुरू असतानाच मैदानात आगीचं दृश्य अस्वस्थ करणारं होतं. खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने धाव घेतली. सामनाधिकाऱ्यांनी खेळ थांबवला. खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. प्रेक्षकांना शांत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. १५ मिनिटं खेळ थांबून राहिला.

आणखी वाचा: Cricket World Cup: पाऊस जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावतो

प्रेक्षकांना शांतता राखण्यासाठी विनंती करण्यात आली. क्लाईव्ह लॉईड यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बरोबरीने आढावा घेतला. खेळ सुरू करता येईल अशी स्थिती झाल्यानंतर खेळाडू मैदानात परतले. पण चेंडू पडण्याआधीच श्रीलंकेचा उपुल चंदना कर्णधार रणतुंगाच्या दिशेने गेला. चंदनाच्या हातात एका प्रेक्षकाने भिरकावलेली बाटली होती. चाहत्यांचा उद्रेक न शमल्याने अखेर सामनाधिकारी क्लाईव्ह लॉईड यांनी श्रीलंकेला विजयी घोषित केलं.

हा निर्णय झाल्यानंतर ओक्साबोक्शी रडणाऱ्या विनोद कांबळीचा चेहरा क्रिकेटरसिकांच्या कायमस्वरुपी कोरला गेला. विनोद म्हणाला होता, ‘मी पाच फलंदाज माघारी परतताना पाहिले. एकाने जरी थांबून भागीदारीसाठी प्रयत्न केले असते तर वेगळं चित्र दिसलं असतं. मी रडलो कारण देशासाठी सामना जिंकून देण्याचं माझं स्वप्न भंगलं’. प्रेक्षकांचा झालेला भावनिक उद्रेक, कांबळीचं रडणं यामध्ये भारत वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे हे मागेच राहिलं. श्रीलंकेला विजयी घोषित करताच भारताचा वर्ल्डकप प्रवास संपुष्टात आला.

आणखी चार दिवसात श्रीलंकेने लाहोर इथे ऑस्ट्रेलियाला नमवत विश्वविजेतेपदावर कब्जा केला.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धूने प्रथम फलंदाजी स्वीकारूया असं म्हटलं होतं पण संघव्यवस्थापनाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. इडन गार्डन्सची खेळपट्टी ऑस्ट्रेलियातून आणलेल्या मातीने तयार करण्यात आली होती. खेळपट्टीचा नूर ओळखण्यात भारतीय संघ कमी पडला. सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथरना ही जोडी पहिल्या १५ षटकात सामन्याचं पारडं आपल्या दिशेने आणून देत. भारतीय संघाने या जोडीला झटपट माघारी परतावलं पण अनुभवी अरविंदा डिसिल्व्हा आणि रोशन महानामा जोडीसमोर भारतीय गोलंदाजी निरुत्तर ठरली.

सचिन तेंडुलकरने आत्मचरित्रात यासंदर्भात लिहिलं आहे. चेंडू फलंदाजांकडे थांबून जात होता. खेळपट्टी वरुन दणक दिसत होती पण खालची माती मोकळी असल्याचं नंतर लक्षात आलं. श्रीलंकेला छोट्या धावसंख्येवर रोखणं आवश्यक होतं कारण या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नव्हतं. पण श्रीलंकेने अडीचशे धावांची मजल मारली.

सामन्यानंतर काय झालं यासंदर्भात संजय मांजरेकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. मैदानात जाहीरपणे रडल्याबद्दल अजय जडेजाने विनोद कांबळीला सुनावलं. कांबळीने भावना काबूत ठेवायला हव्या होत्या असं जडेजाला वाटलं.

यजमान नात्याने भारतीय संघ विश्वविजेतेपदाचा दावेदार होता. सेमी फायनलपर्यंत त्यांनी आगेकूचही केली होती. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सगळी गणितं चुकतच गेली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fans set stands ablaze throw water bottles towards players at eden gardens world cup match vinod kambali cried psp

First published on: 29-09-2023 at 11:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×