मुंबई : प्रतिष्ठेच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेला आज, शुक्रवारपासून गोवा येथे सुरुवात होणार असून या वेळी जगज्जेता दोम्माराजू गुकेश कामगिरी उंचावणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या स्पर्धेत जगातील २०६ सर्वोत्तम खेळाडू बाद फेरी पद्धतीत खेळतील आणि स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू पुढील वर्षीच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
भारताला दोन दशकांहूनही अधिक कालावधीनंतर बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी लाभली आहे. भारताने याआधी २००२ मध्ये यजमानपद भूषवले होते, त्या वेळी विश्वनाथन आनंद विजेता ठरला होता. यंदाच्या स्पर्धेत एकूण २४ भारतीय सहभाग नोंदवणार असून यापैकीच कोणी जेतेपद पटकावेल अशी चाहत्यांना आशा असेल.
पाच वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना यांसारखे आघाडीचे खेळाडूही यंदा खेळणार नाही. त्यांच्या अनुस्थितीत गुकेश, अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद, अनिश गिरी, वेस्ली सो, व्हिन्सेंट केमर, नोदिरबेक अब्दुसत्तोरोव, इयन नेपोम्नियाशी, रिचर्ड रॅपपोर्ट, विदित गुजराथी, निहाल सरीन यांसारखे खेळाडू जेतेपदासाठी आव्हान उपस्थित करतील. महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुखही यावेळी खुल्या गटात सहभाग नोंदविणार आहे.
गुकेश नुकत्याच झालेल्या ‘क्लच चेस चॅम्पियन्स’ स्पर्धेत अखेरच्या स्थानी राहिला. तीन दिवसांच्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी आघाडी घेतल्यानंतर गुकेशची कामगिरी खालावली आणि त्याची पीछेहाट झाली. कार्लसन विजेता ठरला, तर कारुआना आणि नाकामुरा यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. चार खेळाडूंच्या या स्पर्धेत गुकेशने कार्लसनविरुद्ध सहापैकी पाच सामने गमावले. मात्र, कार्लसन, कारुआना आणि नाकामुरा हे तिघे विश्वचषकात खेळणार नसल्याचा आपल्याला फायदा मिळू शकेल असे गुकेश म्हणाला. आता तो जगज्जेत्याला साजेसा खेळ करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.