भ्रष्टाचाराचे आरोप असलेले फिफाचे माजी उपाध्यक्ष मायकल प्लॅटिनी आणि फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्यावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) आठ वर्षांची बंदी घालण्यात आली. फिफाच्या शिस्तपालन समितीने सोमवारी हा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी या दोघांनी शिस्तपालन समितीसमोरील सुनावणीच्यावेळी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्यावर ब्लाटर आणि प्लॅटिनी यांच्यावर ९० दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शिस्तपालन समितीने त्यांना दोषी ठरवल्यास त्यांच्यावर आजीवन बंदी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या शिस्तपालन समितीच्या सुनावणीवर मायकल प्लॅटिनी यांनी बहिष्कार टाकला होता. शिस्तपालन समितीने यापूर्वीच आपला निर्णय तयार केला आहे, त्यामुळे या चौकशीला जाण्यात काही अर्थ नसल्याचे सांगत त्यांनी बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी मात्र या सुनावणीला उपस्थित राहून गैरव्यवहाराचे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. ब्लाटर यांची शिस्तपालन समितीकडून आठ तास कसून चौकशी झाली. त्यांच्यावर या वेळी शिस्तपालन समितीने प्रश्नांच्या फैरी झाडल्या, मात्र त्यांनी यापैकी एकाही आरोपाचे पुरावे नाहीत, असे ब्लाटर यांनी सांगितले होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
‘फिफा’कडून सेप ब्लाटर आणि मायकल प्लॅटिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी
काही दिवसांपूर्वी झालेल्या शिस्तपालन समितीच्या सुनावणीवर मायकल प्लॅटिनी यांनी बहिष्कार टाकला होता.
Written by रोहित धामणस्कर

First published on: 21-12-2015 at 16:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa bans suspended sepp blatter michel platini for eight years