नागपूरच्या ‘स्लम सॉकर’ स्वयंसेवी संस्थेला पहिला ‘डायव्हर्सटिी’ पुरस्कार;  शंभराहून अधिक देशांमधून निवड

प्रामाणिकपणे समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना कोणतीच प्रसिद्धी नको असते. त्यांच्यासाठी त्यांचे कामच महत्त्वाचे असते. मग त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही तरी त्यांचे कार्य अविरत सुरूच राहते, अशीच एक भारतातील संस्था म्हणजे ‘स्लम सॉकर’. ही संस्था फुटबॉलच्या माध्यमातून झोपडपट्टी, पुनर्वसन केंद्रातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणते, त्यांना जगण्याची शिस्त लावते, जगण्यासाठी उद्देश देते.  आपले हे कार्य करत असताना ही संस्था भारताकडून उपेक्षितच राहिली, पण जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा) या फुटबॉल जगातील सर्वोच्च संघटनेने त्यांची दखल घेतली आहे. फिफाने पहिल्यांदाच ‘डायव्हर्सटिी (विविधता)’ हा पुरस्कार देण्याचे ठरवले. या पुरस्कारासाठी फिफाने शंभरपेक्षा अधिक देशांतील संस्थांचे काम पाहिले. या पुरस्कारासाठी फिफाने सर्वोत्तम तीन संस्थांची निवड केली. यामध्ये ‘स्लम सॉकर’सह ‘किक ईट आऊट’ आणि ‘आयजीएलएफए’ या संस्थाही होत्या. पण, फिफाच्या ११ सदस्यीय समितीने स्लम सॉकरची निवड केली.

‘हा आमच्या सर्वासाठी अविस्मरण्ीय क्षण होता. भारतात अजूनही आमची दखल घेतली गेलेली नाही. पण आम्ही त्यासाठी कधी काम केलेही नाही. समाजातील मागासलेल्या मुलांना, लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केले. गेली १५वष्रे आम्ही हे कार्य करत आहोत. फिफाने आमच्या कामाला दिलेली ही दाद आहे. पण, आता आमच्यावरील जबाबदारीही वाढली आहे,’ असे स्लम सॉकरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बारसे यांनी ‘लोकसता’ सांगितले.

नागपूर येथे २००१ साली स्लम सॉकरची स्थापना करण्यात आली. खेळाच्या माध्यमातून सामाजिक स्तरावरील कोणत्याही घटकाशी सहज संवाद साधला जाऊ शकतो. त्यामुळे फुटबॉलची निवड करण्यात आली. ‘सुरुवातीला आम्ही झोपडपट्टी मध्ये जाऊन फुटबॉल खेळायला सुरुवात केली. हळूहळू तेथील मुलेही आमच्या सोबत खेळू लागली. या माध्यमाने त्यांच्याशी संवाद साधला. एकदाही खंड पडू न देता हा दिनक्रम सुरू राहिल्याने अनेक मुले आमच्या संस्थेशी जोडली गेली. हाच धागा पकडून आम्ही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच काम केल,’ असे बारसे अभिमानाने संगतात.

१५ वर्षांत जवळपास ७० हजार मुले-मुली, महिला व पुरुष यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या संस्थेने केले. शक्ती गर्ल, एडय़ूकिक आणि गेम चेंजर्स असे उपक्रम ही संस्थी राबवत असून ‘होमलेस वर्ल्डकप’ स्पध्रेतही ते सहभागी होतात. नागपूरपाठोपाठ चेन्नई, तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये स्लम सॉकरची स्थापना करण्यात आली असून आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशमध्येही लवकरच संस्थेची सुरुवात होणार आहे.  फिफाने दखल घेण्याचे कारण विचारल्यास बारसे म्हणाले, ‘आमच्या विविध उपक्रमात आम्ही कुठेही वर्ग सुरू केले नाही. लहानसे मदान आणि फुटबॉल, हेच आमचे माध्यम. फुटबॉलच्या माध्यमातून आम्ही झोपडपट्टी, पुनर्वसन केंद्रातील मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला, त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवला, स्त्री-पुरुष समानता, एचआयव्ही आदी संवेदनशील विषय फुटबॉलच्या माध्यमातून सहज समजावून सांगितले. उदा. स्त्री-पुरुष समानता; आम्ही मुले व मुली यांचा मिश्र संघ बनवून सामने खेळवतो. पण, येथे मुलींनी गोल केला की दोन गुण हा नियम बनवला आहे. त्यामुळे मुलींना कमी लेखण्याची मुलांची मानसिकता बदलली. प्रत्येक मुलगा दोन गुण मिळवण्यासाठी मुलींना गोल करण्याची संधी निर्माण करून देऊ लागला. यामुळे मुलींचाही आत्मविश्वास वाढला.’

भारत कधी दखल घेणार?

भारतामध्ये फुटबॉलचा विकास व्हावा, यासाठी आपल्याकडे १७-वर्षांखालील विश्वचषकाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. पण हे काम करत असताना ‘स्लम सॉकर’सारख्या संस्थेची भारत दखल कधी घेणार, हा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.