मायकेल प्लॅटिनी, थिअरी हेन्री, लॉरेन्ट ब्लँक, झिनेदिन झिदान, पॅट्रिक व्हिएरा आदी फ्रान्सच्या महान फुटबॉलपटूंचा वारसदार होण्याची क्षमता असलेला खेळाडू म्हणून अमिनी गुईरी याची ख्याती आहे. यंदा कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सची मुख्य मदार त्याच्यावर आहे.

लहानपणापासून फुटबॉलचे वेड असलेल्या अमिनीने शालेय जीवनातच अव्वल फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यादृष्टीने त्याने शालेय स्तरावरील स्पर्धाचा अधिकाधिक अनुभव घेण्यास सुरुवात केली. चांगला खेळाडू होण्यासाठी उत्तम शरीरयष्टी व तंदुरुस्ती आवश्यक आहे, हे त्याने ओळखले होते. दिदियार डेसचॅम्प्स, ईमॅन्युएल पेटिट, प्लॅटिनी, हेन्री यांच्यासारखा व्यावसायिक खेळाडू होण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी नामवंत क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली पाहिजे, असे सतत त्याच्या मनात येई. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला लियान या नामवंत संघांच्या नवोदित खेळाडूंच्या अकादमीत भाग घेण्याची संधी मिळाली. अशी हुकमी संधी चालून आल्यानंतर अमिनीला स्वर्ग दोन बोटे उरली असल्याचा भास झाला. अर्थात त्याने या अकादमीत एकाग्रतेने सराव केला. त्याला लियानच्या कनिष्ठ संघाकडून भाग घेण्याची संधी लाभली. त्यामध्ये त्याने चमक दाखविली.

अमिनीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे ध्येय २०१६ मध्ये साकार झाले. त्याच वर्षी त्याने १६ वर्षांखालील गटाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय संघाकडून खेळताना त्याने अकरा सामन्यांमध्ये चार गोल नोंदवले. त्याने केलेल्या गोलांची संख्या जरी कमी असली तरी अन्य सहकाऱ्यांना गोल करून देण्यात त्याने केलेली साथ मोलाची होती. यंदा त्याला फ्रान्सच्या १७ वर्षांखालील संघाकडून खेळण्याचा मान मिळाला आहे. आतापर्यंत त्याने तेरा सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. त्यामध्ये त्याने पंधरा गोल केले. सतरा वर्षांखालील गटाच्या युरोपियन स्पर्धेत त्याने आठ गोल करीत आपलाच सहकारी ओडोसन एडवर्डच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याच्या या कामगिरीने व्यावसायिक फुटबॉल क्लबच्या मालकांचे लक्ष वेधले गेले नाही तरच नवल. लियान क्लबने त्याला तीन वर्षांकरिता करारबद्ध केले आहे. त्याच्याकडे चेंडू आला की तो गोलातच जाणार असे म्हटले जाते. चेंडूवर अप्रतिमरीत्या नियंत्रण ठेवण्याची उपजत शैली त्याच्याकडे आहे. तसेच आपल्या सहकाऱ्यांना योग्य रीतीने पास देण्यातही तो कमी पडत नाही. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासारखे वर्चस्व तो गाजवू शकेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच आगामी विश्वचषक स्पर्धेत तो कशी कामगिरी करतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.