युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळलेले भारतीय फुटबॉल टीममधले खेळाडू हे या क्षेत्रातले नवे हिरो आहेत. त्यांना पुढची काही वर्षे एकत्र बांधून ठेवणे ही भारतीय फुटबॉलची भविष्यातली गरज आहे.
युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यशाबाबत सुरुवातीला साशंकता होती. या स्पर्धेच्या यशाचे गणित भारतीय संघाच्या कामगिरीवर अवलंबून होतेच. पण भारत साखळी फेरीचा अडथळाही पार करणार नाही याची खात्रीही होती. तरीही भारताच्या लढतींना लाभलेली गर्दी उत्स्फूर्त होती. ४६ हजारांतील २०-२२ हजार प्रेक्षक हे विद्यार्थी होते. मात्र ही जमवाजमवी व्यर्थ गेली नाही. भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वाची मनं नक्की जिंकली. आज भारताच्या अनेक खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी युरोपातील काही क्लब प्रयत्नशील आहेत. हीच या खेळाडूंच्या कामगिरीला मिळालेली पोचपावती म्हणावी लागेल.
भारताला युवा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळणे, त्यामुळे पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) स्पर्धेत भारताला खेळण्याची संधी मिळणे आणि त्यानिमित्ताने का होईना युवा फुटबॉलपटूंच्या विकासाचा विचार होणे या सर्व बाबी भारतीय फुटबॉलला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या ठरल्याच, पण त्याचबरोबर भारतीय फुटबॉल टीमच्या मर्यादा स्पष्ट करण्यासाठी पूरक ठरल्या. नाहीतर आणखी बरीच वर्ष आपण फिफा स्पर्धेत खेळण्याची कृतिशून्य स्वप्न रंगवत बसलो असतो. त्यामुळे या युवा विश्वचषक स्पर्धेचे ऋण आपण मान्य केले पाहिजेत. ही स्पर्धा भारतात होणार या घोषणेपासून ते पहिला सामना खेळण्यासाठी खेळाडू मदानात उतरेपर्यंत अनेक क्रीडा तज्ज्ञांनी भारतीय फुटबॉल क्षेत्राची लक्तरे वेशीवर टांगली होती. अर्थात त्याला संबंधित संघटनेची अकार्यक्षम वृत्ती जबाबदार होती हेही तितकेच खरे. पण ही नकारात्मक मते बदलायला सुरुवात झालीय.
नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम वरील ६ ऑक्टोबर २०१७ हा दिवस भारतीय फुटबॉलच्या क्रांतीची बिजे रोवणारा आहे. या दिवशी भारताचे युवा फुटबॉलपटू केवळ फिफाच्या स्पर्धेत खेळून परतले नाही, तर मिळालेल्या संधीवर रण मारून आले. कधी कधी लढाई न जिंकताही आपण युद्ध जिंकतो हा क्षण तसाच होता. क्रिकेटच्या मदानावरील ‘इंडिया.. इंडिया..’ या जयघोष फुटबॉल सामन्यातही तितकाच आपलासा, प्रेरणादायी, उत्साहवर्धक, रोमांच आणणारा असतो, याची जाणीव या स्पर्धेने करून दिली. फिफाच्या स्पर्धेत डौलाने फडकणारा तिरंगा पाहून केवळ स्टेडियमवरील उपस्थितांचाच नव्हे तर टीव्हीवर हा सोहळा पाहणाऱ्या प्रत्येकाचा उर अभिमानाने नक्की भरून आला असेल.
भारतीय खेळाडू मदानावर येईपर्यंत निराशावादी वाटणाऱ्या स्टेडियमवर अचानक जादूची कांडी फिरली. अमेरिकेविरुद्धच्या त्या लढतीसाठी भारताचे शिलेदार एका मागोमाग मदानावर दाखल होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘इंडिया.. इंडिया’चा तो नारा अंगावर रोमांच आणणारा होता. मदानावर उपस्थित प्रेक्षकांच्या मनात अभिमानाची भावना होती. त्याबरोबरच मदानावर ९० मिनिटे खेळणाऱ्या त्या युवा भारतीयांच्या मनात नक्की काय चालले असेल याचा अंदाज घेणे अवघड होते. त्यांच्या डोळ्यांतून त्यांच्या मनातील छटा उमटत होत्या. आत्ता नाही तर कधी नाही, हा एकच ध्यास त्यांना होता. त्यांनी त्याच ध्यासाने झपाटल्यासारखा खेळ केला. केवळ अमेरिकी संघाविरुद्धच नव्हे तर कोलंबिया आणि घाना या बलाढय़ संघांना भारतीय खेळाडूंनी चुरशीची लढत दिली. एकीकडे वयाच्या सातव्या वर्षांपासून फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणाऱ्या, ज्यांना या खेळातील बारकावे लहानपणीच समजतात अशा खेळाडूंना दोन अडीच वर्षांपूर्वी तयार झालेल्या भारतीय संघाने झुंजवले, यापेक्षा अधिक या खेळाडूंकडून काय अपेक्षा करायला हवी?
यजमानपद मिळाल्यानंतर भारतीय संघाची बांधणी सुरू झाली. परदेशातील भारतीय वंशाच्या फुटबॉलपटूंचीही निवड करण्यात आली आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून शोधमोहीम राबवली गेली. त्यातून निवडलेल्या अंतिम २४ जणांची भारतीय फूटबॉलच्या इतिहासात नोंद झाली, ते विश्वचषक स्पर्धेत खेळले म्हणून नव्हे तर स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्यांना आज देश ओळखतोय. ‘भारतीय खेळाडूंनी आम्हाला खरेच आश्चर्यचकित केले. त्यांचा खेळ पाहून या खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव नाही असे कुणी म्हणणार नाही. आमच्या अनुभवी खेळाडूंच्या तोडीचा खेळ करण्यात ते किंचित कमी पडले इतकेच,’ ही अमेरिकेचे प्रशिक्षक जॉन हॅकवर्थ यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया किती बोलकी आहे. शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळातील तांत्रिक बारकावे वगळल्यास भारतीय खेळाडू कुठेच कमी नव्हते.
गोलरक्षक धीरज सिंग तर भारतीय फुटबॉल चाहत्यांचा हिरो बनला. प्रतिस्पर्धी संघाचे गोल त्याने ज्या कौशल्याने रोखले ते पाहून सर्वच अवाक् झाले. त्याला परदेशातील क्लबकडून खेळण्याचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी पहिला आणि एकमेव गोल नोंदवणारा जिक्सन सिंग, कर्णधार अमरजीत सिंग, रहीम अली, अनवर अली, कोमल थाटल, नमित देशपांडे, केपी राहुल, अनिकेत जाधव, संजीव स्टॅलीन, बोरीस थांगजाम ही आता केवळ नावं राहिली नाहीत तर एक राष्ट्रीय अभिमानाचा विषय झाले आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय फुटबॉलला मिळालेली ही अनमोल रत्नं. आता त्यांच्या भविष्यातील वाटचालीची जबाबदारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या ( एआयएफएफ) खांद्यावर आहे. ‘भारतीय खेळाडूंचा मला अभिमान आहे. या खेळाडूंमध्ये जिंकण्याची भूक आहे आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची त्यांची तयारी आहे. आता विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपले म्हणून या संघाचे काम संपले असे होत नाही आणि तसे होऊ नये ही अपेक्षा. या खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळवण्याची गरज आहे,’ भारताचे प्रशिक्षक लुइस नॉर्टन डी माटोस यांनी घानाविरुद्धच्या सामन्यानंतर दिलेली प्रतिक्रिया.
माटोस यांच्याही या खेळाडूंकडून अपेक्षा उंचावल्या आहेत आणि म्हणूनच एवढय़ा आत्मीयतेने त्यांनी स्पर्धेनंतर येणाऱ्या आव्हानांची जाणीव करून दिली. पण त्याच वेळी केवळ खेळाडू घडवणे महत्त्वाचे नसून भारतात फुटबॉल संस्कृती निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, त्यात तथ्य आहे. कारण विश्वचषक स्पर्धा आहे म्हणून भारतीय प्रेक्षक हा खेळ फॉलो करत आहेत. पण नंतर हे प्रेम असेच कायम राहील याची खात्री नाही. त्यामुळे सुरुवातीपासून ही मुलं प्रेक्षकांचा पािठबा हवा अशी विनंती करत होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन मोठय़ा संख्येने प्रेक्षक आले. पण पुढे काय हा प्रश्न माटोस यांनी उपस्थित केला आहे.
या स्पर्धेमुळे ‘एआयएफएफ’ही जागे झाले आहेत आणि त्यांनी काही सकारात्मक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा या युवा खेळाडूंना एकत्र ठेवण्याचा. ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल)मध्ये विविध क्लबकडून करारबद्ध झाल्यानंतर केवळ बाकावर बसून खेळ पाहण्यापेक्षा या खेळाडूंचाच एक संघ ‘आय- लीग’मध्ये खेळवण्याचा निर्णय. हा संघ पुढील दोन-तीन वष्रे सोबत राहील आणि ‘आय-लीग’मधील इतर क्लबविरुद्ध जवळपास १८-२० सामने खेळून तो परिपक्व होईल. आता त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. एकूण काय तर स्पर्धेच्या सुरुवातीला आलेला फुटबॉलचा हा वारा स्पर्धेअंती नाहीसा होऊ नये हीच अपेक्षा.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा