१९३० ते १९९० या काळात युगोस्लाव्हिया संघाचा भाग असलेला आणि स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी फिफाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये परतलेला संघ म्हणजे क्रोएशिया. १९९१मध्ये क्रोएशिया राष्ट्रीय संघाची स्थापना झाल्यानंतर क्रोएशियाने अल्पावधीतच फिफा विश्वचषकात स्थान मिळवले. १९९८मध्ये फिफा विश्वचषकात पदार्पण करणारा क्रोएशिया संघ फक्त एकदाच फिफा विश्वचषक आणि युरोपियन चषकासाठी पात्र ठरला नाही. पदार्पणातच सर्वोत्तम कामगिरी साकारून क्रोएशियाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत सर्वानाच आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. १९९०च्या दशकात क्रोएशियाने सुवर्णकाळ अनुभवला. पण त्यांना संघात आता गुणवत्तेचा अभाव जाणवत आहे. क्रोएशियाने पात्रता फेरीत पाच विजय आणि एक सामना बरोबरीत राखत बेल्जियमसह समान गुण मिळवले. मात्र पुढील चार सामन्यांत फक्त एक गुण मिळवता आल्यामुळे त्यांना प्ले-ऑफ फेरीत आइसलँडविरुद्ध खेळावे लागले. २००२ आणि २००६मध्ये खेळलेले माजी कर्णधार निको कोव्हाक यांच्याकडेच प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेतून सहज बाहेर काढत फिफा विश्वचषकाचे तिकीट मिळवून दिले.
मारिया मांझुकिक याच्यावर क्रोएशियाची भिस्त असणार आहे. बायर्न म्युनिकच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मांझुकिकने आतापर्यंत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे क्रोएशियाला बाद फेरीत नेण्यात मांझुकिकची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कर्णधार दारिजो सरना याने पात्रता फेरीत फारच नेत्रदीपक कामगिरी केली होती. मधल्या फळीतील लुका मॉड्रिक, निको क्रांकजारसारख्या खेळाडूंना चांगला सूर गवसल्यास, ते प्रतिस्पध्र्याच्या बचाव फळीसाठी धोकादायक ठरू शकतात. एड्वाडरे, मारियो मांझुकिक आणि इव्हिका ऑलिक हे आक्रमकवीर प्रतिस्पध्र्याचा बचाव भेदून कोणत्याही क्षणी गोल करू शकतात. मांझुकिकने ४८ सामन्यांत १३ तर मॉड्रिकने ७३ सामन्यांत आठ गोल केले असले तरी चेंडूवर ताबा मिळवण्याचे कौशल्य आणि दुरूनच गोल करण्याची क्षमता त्यांच्यासाठी उजवी ठरणार आहे. राकिटिककडे वेग आणि गुणवत्ता आहे.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
भक्कम बचाव, मजबूत मधली फळी, पासिंगचा सुरेख खेळ आणि आक्रमण करण्यात पटाईत, ही क्रोएशियाची बलस्थाने आहेत. माजी कर्णधार निको कोव्हाक यांच्याकडेच प्रशिक्षकपदाची सूत्रे दिल्यामुळे क्रोएशियाला प्रशिक्षकपदाचा अनुभव कमी पडणार आहे. आइसलँडविरुद्धच्या प्ले-ऑफ फेरीत मांझुकिकला लाल कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्याचा विश्वचषकातील सहभाग कमी असणार आहे. बंदीमुळे पहिल्या दोन सामन्यांत मांझुकिक खेळणार नसल्याचा फटका क्रोएशियाला बसू शकतो.
अपेक्षित कामगिरी
क्रोएशियाची तुलना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बडय़ा संघांशी केली जाते. संघात अफाट गुणवत्ता असल्यामुळे ते कोणत्याही संघाला पराभूत करू शकतात. ब्राझीलविरुद्धचा अ-गटातील पहिलाच सामना ते गमावतील, अशी शक्यता आहे. पण त्यानंतर क्रोएशिया संघ मेक्सिको आणि कॅमेरूनवर विजय साकारेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. ब्राझील संघ गटात अव्वल स्थान पटकावणार यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकासाठी क्रोएशियाची लढत मेक्सिको आणि कॅमेरूनशी असणार आहे. बाद फेरीत स्थान मिळवायचे असल्यास क्रोएशियाला मेक्सिकोसारख्या संघाला पराभूत करावे लागणार आहे. साखळी फेरीचा अडथळा पार केला तरी क्रोएशिया अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवणे कठीण आहे. कारण बाद फेरीत त्यांना स्पेन आणि नेदरलँड्स या गतवेळच्या अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या संघांशी दोन हात करावे लागणार आहेत.
फिफा क्रमवारीतील स्थान : २०
विश्वचषकातील कामगिरी
*  सहभाग : ४ वेळा (२०१४सह)
*  जेतेपद : अद्याप नाही
*  तिसरे स्थान : १९९८
संघ
गोलरक्षक : स्टिपे प्लेटिकोसा, डॅनियल सुबासिक. बचावफळी : दारिजो सरना, वेदरान कोरलुका, इव्हान स्ट्रिनिक, देजान लोवरेन, दोमागोज विदा, गॉडन स्किडेनफेल्ड, सिमे वसॉल्जको, होर्वे मिलिक. मधली फळी : लुका मॉड्रिक, इव्हान राकिटिक, ऑर्गनजेन वुकोजेविक, डॅनिजेल प्राजिनिक, इव्हान पेरिसिक, मटेओ कोवाकिक, मटे मालेस. आघाडीवीर : इव्हिका ऑलिक, एड्वाडरे, मारियो मांझुकिक, निकिका जेवालिक, आन्ते रेबिक.
स्टार खेळाडू : मारियो मांझुकिक, लुका मॉड्रिक, दारिजो सरना, इव्हान राकिटिक, इव्हिका ऑलिक, एड्वाडरे
व्यूहरचना : ४-३-३

मुख्य प्रशिक्षक : निको कोव्हाक