फिफा विश्वचषकाची रणधुमाळी सुरू होण्याआधीच जर्मनीला मोठा धक्का बसला आहे. अखेरच्या सराव सामन्यात गुडघा दुखावल्यामुळे जर्मनीचा मधल्या फळीतील खेळाडू मार्को रेऊस याने विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. जर्मनीचा संघ शनिवारी ब्राझीलला रवाना झाला असून रेऊसच्या दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी श्कोड्रान मस्तफी याला विश्वचषकाचे तिकीट मिळाले आहे.
घाना, पोर्तुगाल आणि अमेरिका अशा बलाढय़ संघांसह जर्मनीचा क गटात समावेश आहे. मेंझ येथे शुक्रवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने अर्मेनियाचा ६-१ असा धुव्वा उडवला. पण संघ रवाना होण्यापूर्वीच रेऊसच्या डाव्या पायाचा गुडघा दुखावला गेला. ‘‘मार्को सध्या तुफान फॉर्मात होता. कॅमेरून आणि अर्मेनियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सराव सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याच्या दुखापतीचा संघाला जबर फटका बसणार आहे. फिफा विश्वचषकासाठी आखण्यात आलेल्या रणनीतीत त्याच्याकडे महत्त्वाची भूमिका होती,’’ असे जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लो यांनी सांगितले.
बोरुसिया डॉर्टमंडकडून खेळताना मार्को रेऊसने या मोसमात स्पॅनिश लीगमध्ये सुरेख कामगिरी केली होती. त्याउलट मस्तफीला मे महिन्यात पोलंडविरुद्धच्या सामन्यासाठी जर्मनी संघात स्थान मिळाले होते. विश्वचषकासाठीच्या संघात त्याचा समावेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र अंतिम संघात त्याला स्थान मिळाले नव्हते.
‘‘रेऊसची जागा भरून काढणे कठीण आहे. पण मधल्या फळीत आमच्याकडे लुकास पोडोलस्की, आंद्रे शरल, मार्को गोएट्झे, थॉमस म्युलर, मेसूत ओझिल, ज्युलियन ड्राक्सलर आणि टोनी क्रूस असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळेच आम्ही मस्तफीसारख्या बचावपटूला संधी दिली,’’ असेही जोकिम लो यांनी सांगितले.