मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रविवारी (२४ एप्रिल) वयाच्या पन्नाशीत पदार्पण करणार आहे. २०० कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करून जवळपास नऊ वर्षे उलटली असली, तरी त्याच्याप्रति चाहत्यांचे प्रेम तिळभरही कमी झालेले नाही. ‘आयपीएल’मध्ये रविवारी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने येणार असून ही लढत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. सचिनचे हे सर्वात आवडते मैदान. विशेष म्हणजे सचिन सध्या मुंबई इंडियन्स संघाच्या प्रेरकाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान चाहते सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आणि वानखेडेमध्ये ‘सचिन..सचिन’चा नारा दुमदुमणार यात जराही शंका नाही.

काही दिवसांपूर्वीच मुंबईचा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना झाला. या सामन्यादरम्यान समालोचकांनी सचिनशी संवाद साधला. त्यांनी सचिनला तू आता वयस्कर होत चालला आहेस, असे गमतीत म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सचिननेही त्यांना मजेशीर उत्तर दिले. ‘‘मी ४९ वर्षांचा नाही. मी तर केवळ २० वर्षांचा आहे आणि माझ्या गाठीशी २९ वर्षांचा अनुभव आहे,’’ असे तो म्हणाला.

‘मास्टर ब्लास्टर’ अशी ख्याती मिळवलेल्या सचिनची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने (६६४), सर्वाधिक धावा (३४३५७), सर्वाधिक शतके (१००) आणि सर्वाधिक अर्धशतके (१६४) असे असंख्य विक्रम सचिनच्या नावावर आहेत. या अलौकिक कामगिरीमुळेच २०१४मध्ये त्याला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले होते. सचिन हा आजही भारतातील अनेक खेळाडूंचा आदर्श आहे. त्यामुळे पन्नाशीत पर्दापण करणाऱ्या सचिनवर रविवारी शुभेच्छांचा वर्षांव होणार, हे नक्की.