लिंबूटिंबू नव्हे तर मुख्य प्रवाहातील संघ म्हणून प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या जम्मू काश्मीर संघाने रणजी करंडक स्पर्धेत पहिल्यांदाच दिल्लीला चीतपट केलं. ६५ वर्षात पहिल्यांदाच जम्मू काश्मीर संघाने दिल्लीला नमवण्याची किमया केली. १९६० पासून दिल्ली आणि जम्मू काश्मीर ४३ वेळा आमनेसामने उभे ठाकले. यापैकी ३७ सामन्यात दिल्लीने थेट विजय मिळवला.

रणजी करंडक स्पर्धेत, ४ सामन्यांनंतर दिल्लीचे ७ गुण झाले आहेत. बाकी ६ संघांचीही हीच स्थिती आहे. बादफेरीसाठी पात्र ठरण्यासाठी दिल्लीला चमत्कार घडवावा लागेल. अंतर्गत बंडाळ्यांनी नेहमीच ग्रस्त असलेल्या दिल्लीचे डावपेच अनाकलनीय असे होते. अनुभवी कर्णधार नसणं, गटातटाचं राजकारण याचा फटकाही दिल्लीला बसला आहे.

दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या लढतीत जम्मू काश्मीरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. ऑक्वीब नबीच्या ५ विकेट्सच्या बळावर काश्मीरने दिल्लीचा डाव २११ धावांतच गुंडाळला. दिल्लीतर्फे आयुश दोसेजाने ६५ तर कर्णधार आयुष बदोनीने ६४ धावांची खेळी केली. सुमीत माथूरने ५५ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. जम्मू काश्मीरने ३१० धावा करत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. कर्णधार पारस डोगराने १०६ धावांची खेळी केली. अब्दुल समदने ८५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. दिल्लीकडून सिमरजीत सिंगने ६ विकेट्स घेतल्या.

दिल्लीचा दुसरा डाव २७७ धावांतच आटोपला. आयुष बदोनीने ७२ तर आयुश दोसेजनाने ६२ धावांची खेळी केली. दिल्लीने काश्मीरसमोर १७९ धावांचं लक्ष्य मिळालं. कामरान अक्बलच्या तडाखेबंद १३३ धावांच्या खेळीच्या बळावर काश्मीर संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. त्याने २० चौकार आणि ३ षटकारांसह ही खेळी सजवली.

काश्मीरला यंदाच्या हंगामातल्या सलामीच्या लढतीत मुंबईने हरवलं. या पराभवातून बोध घेत जम्मू काश्मीरने राजस्थानवर एक डाव आणि ४१ धावांनी विजय मिळवला. ऑक्वीब नबीने सामन्यात १० विकेट्स पटकावताना ५५ धावाही केल्या. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

छत्तीसगढविरुद्धचा सामना अनिर्णित झाला. दिल्लीला हरवत जम्मू काश्मीरने चांगली आगेकूच केली आहे.