भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील दोन कसोटी सामने झाले असून दोनही सामन्यात भारताच्या पदरी पराभव आला आहे. दुसऱ्या कसोटीत तर भारतीय संघाची फलंदाजी लज्जास्पद होती. अनेकांनी या फलंदाजीवर टीका केली. काहींनी तर थेट सचिन, द्रविड आणि लक्ष्मण यांना संघात परत स्थान द्या, अशीही काहींनी मिश्किल टीका केली. याच संदर्भात एक गोष्ट म्हणजे भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आजच्या दिवशी (१४ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले होते. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे हे शतक त्याने इंग्लंड विरुद्ध ठोकले होते. ICC आणि BCCIने या आठवणीला उजाळा दिला आहे.

१४ ऑगस्ट १९९० रोजी सचिन तेंडुलकरने आपले पहिलेवहिले शतक झळकावले होते. त्यावेळी सचिनचे वय केवळ १७ वर्षे होते. मँचेस्टर येथे इंग्लंडविरूद्ध हा सामना सुरु होता. या सामन्यात सचिनने नाबाद ११९ धावा केल्या होत्या आणि भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले होते.

 

असा रंगला होता तो सामना –

सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ग्रॅहम गूच, माईक आर्थटन आणि रॉबिन स्मिथ यांच्या शतकाच्या जोरावर ५१९धावांचा डोंगर रचला होता. या आव्हानचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. सध्याचे संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि नवज्योत सिंग सिद्धू हे सलामीवीर अवघ्या ४८ धावांत तंबूत परतले होते. त्यानतंर मोहम्मद अझरूद्दीन (१७९) आणि संजय मांजरेकर (९३) यांनी डावाला आकार दिला होता. आणि भारताला पहिल्या डावात ४३२ धावांपर्यंत मजल मारून दिली होती.

त्यानंतर दुसरा डाव इंग्लंडने ४ बाद ३४० धावांवर डाव घोषित केला होता. त्या डावात अॅलन लम्ब याने १०९ धावा केल्या होत्या आणि भारतापुढे विजयासाठी ४०८ धावांचे अंतिम लक्ष्य ठेवण्यात होते. दुस-या डावातही भारतीय फलंदाजांची कामगिरी खराबच राहिली होती. एका वेळी भारताची अवस्था ६ बाद १८३ इतकी बिकट झाली होती. पण ऐन वेळी सचिन आणि मनोज प्रभाकर या दोघांनी अप्रतिम फलंदाजी करत भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले होते. सचिनने नाबाद ११९ तर मनोज प्रभाकरन नाबाद ६७ धावा केल्या होत्या. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली होती. त्यामुळेच भारताला हा सामना अनिर्णीत राखता आला होता.