द फेडरेशन ऑफ मोटारस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियातर्फे (एफएमएससीआय) आयोजित या वर्षांच्या इंडियन रॅली अजिंक्यपद स्पर्धेतील पाचव्या फेरीचा थरार २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत बंगळुरूवासीयांना अनुभवता येणार आहे. कर्नाटक मोटारस्पोर्ट्स क्लबच्या वतीने होणाऱ्या ‘के-१००० रॅली’ या फेरीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी गौरव गील, अमरितजीत घोष, अर्जुन राव यांच्यात चुरस पाहायला मिळेल.
बंगळुरू येथील ओरियन मॉलजवळ शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता झेंडा दाखवून या फेरीचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ७ वाजता बंगलोर इंटरनॅशनल एक्झेबिशन सेंटरमध्ये प्रेक्षकांसाठी या फेरीचा विशेष टप्पा होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजल्यापासून मुख्य फेरीला सुरुवात होणार आहे.
दोडागुनी, ग्युबी या भागात फेरीचा मार्ग असणार आहे. फेरीचा समारोप रविवारी दुपारी ४ वाजता पेअरफिल्ड मॅरिएट या हॉटेलमध्ये होणार आहे. जूनमध्ये नाशिक येथे झालेल्या पहिल्या फेरीत ‘रॅली ऑफ महाराष्ट्र’मध्ये तसेच जुलै महिन्यात झालेल्या ‘रॅली ऑफ कोइम्बतूर’ या दुसऱ्या फेरीत गौरव गील, मुसा शरीफ ही जोडी अव्वल स्थानी राहिली होती. तिसऱ्या फेरीत मात्र समीर थापर, गुरिंदर मान जोडीने प्रथम क्रमांकावर झेप घेतली. परंतु चौथ्या फेरीत गील-शरीफ यांनी पुन्हा अव्वल स्थान पटकावले. ‘२००० सीसी क्लास’ गटात राहुल कात्याराज-विवेक भट, ‘१६०० सीसी’ गटात अर्जुन राव-सतीश राजगोपाल हे अव्वल स्थानी आहेत.