देशात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी आवश्यक असणारे विपुल नैपुण्य आहे. त्याच्या विकासाकरिता भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे, असे प्राधिकरणाचे सरसंचालक इंजेती श्रीनिवास यांनी सांगितले.
राष्ट्रीय कुमार जलतरण स्पर्धेनिमित्त श्रीनिवास येथे आले होते. कनिष्ठ गटातील मुलामुलींची कामगिरी पाहून त्यांना खूप आनंद झाला. या कामगिरीबाबत श्रीनिवास म्हणाले की, ‘‘गेल्या सहा सात वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढत आहे. विशेषत: कनिष्ठ गटातील खेळाडूंचा उत्साह अवर्णनीय आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पालकही देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात हे पाहिल्यावर आपल्या पाल्यांच्या कामगिरीबाबत त्यांना किती जाणीव आहे हे लक्षात येते.’’
देशाच्या क्रीडा धोरणाविषयी श्रीनिवास म्हणाले की, ‘‘सध्या आम्ही २०२० व २०२४ च्या ऑलिम्पिकवर अधिक लक्ष केंद्रित करीत आहोत. २०२० च्या स्पर्धेत किमान २० पदके मिळविली पाहिजेत या हेतूने आम्ही कनिष्ठ खेळाडूंवर अधिक लक्ष देत आहोत. ऑलिम्पिकमध्ये ज्या क्रीडा प्रकारात आपल्या देशास पदकांची संधी आहे, अशा खेळांमधील संभाव्य पदक विजेत्या खेळाडूंचा एक गट तयार करून त्यांच्या प्रशिक्षणावर अधिक लक्ष दिले जाणार आहे. या खेळाडूंना राष्ट्रीय सराव शिबिरात संधी दिली जाईल व त्यांच्या कामगिरीचा नियमितरीत्या आढावा घेतला जाणार आहे. या खेळाडूंपैकी काही खेळाडूंना आलटून-पालटून परदेशातील स्पर्धामध्ये सहभागाची संधी दिली जाईल. तेथील कामगिरीच्या आधारे त्यांच्या पुढच्या प्रशिक्षणातील सुधारणा करण्यावर भर देता येईल.’’
केंद्र शासनाने ऑलिम्पिक पदक व्यासपीठ योजना (टीओपी) सुरू केली आहे. त्याविषयी श्रीनिवास म्हणाले, खेळाडूंसाठी अतिशय चांगली योजना म्हणून त्याचे कौतुक केले जात आहेत. केंद्र शासनाच्या अर्थसाहाय्याकरिता विनाविलंब या अर्जाची दखल घेतली जात आहे. खेळाडूंची कामगिरी पाहूनच ही मदत दिली जात असल्यामुळे नैपुण्यवान खेळाडूंना परदेशातील सराव, परदेशी प्रशिक्षण आदी गोष्टींकरिता त्वरित मदत मिळत आहे. अनेक खेळाडूंनी या योजनेचे कौतुक केले आहे. ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांचा सुरुवातीस या योजनेत विचार करण्यात आला नव्हता, मात्र त्यांनी कॅनडातील स्पर्धेत अव्वल कामगिरी केल्यामुळे त्यांनाही आता या योजनेत सहभागी केले जाणार आहे. कोणत्या खेळाडूंना या योजनेत सहभागी करून घ्यायचे याचा निर्णय संबंधित खेळाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकाच्या सल्ल्याने व शिफारशीनुसार घेतला जात असतो. त्यामध्ये शासन कधीही हस्तक्षेप करीत नसते.
केरळमधील साइ केंद्रात झालेल्या आत्महत्येच्या घटनेविषयी विचारले असता श्रीनिवास म्हणाले, अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी साइच्या प्रत्येक केंद्रात मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. शक्यतो आपल्या घराच्या जवळच्या केंद्रात खेळाडूंना सरावाची संधी मिळेल याची काळजी घेतली जात आहे, केंद्रातील खेळाडूंशी नियमितपणे सुसंवाद ठेवण्याबाबत केंद्र संचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच वेळोवेळी खेळाडूंची मानसिक तंदुरुस्ती चाचणी घेण्याबाबतही सूचना केल्या आहेत.