T20 world cup Final Match: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २९ जून २०२४ रोजी बार्बाडोसच्या मैदानावर भारतानं दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलेलं मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर दिसलं. दक्षिण आफ्रिकेबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात सुर्यकुमार यादवने पकडलेली कॅच, हार्दिक पंड्याची शेवटची ओव्हर सर्वांना लक्षात राहिली. विश्वचषकाच्या विजयाबद्दल त्यांचं कौतुकही झालं. मात्र विश्वचषकाला तीन महिने झाल्यानंतर रोहित शर्मानं ऋषभ पंतच्या एका कृतीचा उल्लेख करून त्याला विजयाचं श्रेय दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना ऋषभ पंतच्या एका चलाखीमुळं सामना आमच्याबाजूनं फिरला, असं रोहितनं म्हटलं आहे.
नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये कर्णधार रोहित शर्मा संघातील सहकारी सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्यासह सहभागी झाला होता. या शोमध्ये रोहितनं ऋषभ पंतच्या चलाखीचा उल्लेख केला आहे. “त्यांच्या हातात खूप विकेट होत्या आणि मैदानावरील फलंदाजाचा जम बसला होता. आम्हाला थोडी चिंता वाटत होती. पण कर्णधाराला अशावेळी चेहऱ्यावार चिंता दाखवून चालत नाही”, असे रोहित शर्मा शोमध्ये म्हणाला.
नेमकं काय झालं?
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं सात गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात १२-२ अशी रखडत झाली. मात्र नंतर त्यांनी चांगला खेळ दाखवत १६ ओव्हरमध्ये १५१-४ अशी धावसंख्या उभारली. शेवटच्या चार ओव्हरमध्ये त्यांना केवळ २६ धावा हव्या होत्या.
रोहित शर्मा म्हणाला की, १७ व्या षटकाच्या सुरुवातीला ऋषभ पंत पायाला दुखापत झाल्यामुळं मैदानावर अशरक्षः झोपला. त्यानंतर फिजियोनं मैदानावर येऊन त्याचा गुडघा पाहिला. यामध्ये थोडा वेळ गेला आणि त्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. हार्दिक पंड्याच्या पहिल्याच बॉलवर धोकादायक हेनरिक क्लासेन बाद झाला. ज्यानं २७ चेंडूत ५२ धावा कुटल्या होत्या. ऋषभ पंतमुळं सामन्यात झालेला विलंब पथ्यावर पडला, असं रोहित शर्मानं सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात केवळ सात धावांनी पराभव झाला. रोहितनं सांगितलं की, ऋषभनं डोकं वापरून खेळ संथ केल्यामुळं आम्हाला संधी मिळाली आणि सामन्याचा नूरच पालटला.
अनेक कारणांपैकी हेही एक कारण विजयासाठी कारणीभूत
रोहित शर्मानं पुढं म्हटलं, “त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चांगल्या फॉर्मात होते. त्यांना पटापट चेंडू पडतील, असं वाटत होतं. आम्हाला त्यांची लय तोडण्यासाठी थोडा वेळ हवा होता. मी गोलंदाजाशी दुसऱ्या एंडला बोलत असतानाच ऋषभ पंत स्टम्पच्या मागे जमिनीवर कोसळलेला आम्हाला दिसला. फिजियोनं येऊन त्याला तपासलं. तोपर्यंत क्लासेन तसाच उभा होता. अंतिम सामन्यात विजयासाठी हेच एक कारण कारणीभूत ठरलं, असं मी म्हणणार नाही. पण अनेक कारणांपैकी हेही एक असू शकतं.”