लहान मुलांना कोणत्याही खेळाचे प्रशिक्षण द्यावयाचे असेल तर त्यांना या खेळाचा आनंद देत त्याद्वारे स्पर्धात्मक प्रशिक्षण दिल्यास चांगले खेळाडू घडतात, असे बार्सिलोना क्लब या ख्यातनाम स्पॅनिश क्लबचे ज्येष्ठ प्रशिक्षक अ‍ॅन्तोनी क्लेव्हेरिया यांनी सांगितले. नवी दिल्लीतील कॉन्शियट फुटबॉल अकादमीने बार्सिलोना क्लबबरोबर प्रशिक्षण योजनेबाबत करार केला आहे. या योजनेंतर्गत भारतात १४ शहरांमध्ये ६ ते १७ वर्षे वयोगटातील नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरिता बार्सिलोना क्लबने क्लेव्हेरिया यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आतापर्यंत जयपूर, नवी दिल्ली, बंगळुरू येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. पुण्यातील शिबिराचीही नुकतीच सांगता झाली. या शिबिरांविषयी क्लेव्हेरिया यांनी ‘लोकसत्ता’शी केलेली बातचीत.
भारतात फुटबॉलसाठी कितपत नैपुण्य आहे आणि त्याच्या विकासासाठी काय करायला हवे?
भारतात फुटबॉलसाठी विपुल प्रमाणात नैपुण्य आहे. लहान मुलांमध्ये या खेळाचे भरपूर आकर्षण आहे. मात्र अपेक्षेइतका या मुलांचा विकास होत नाही. येथील शैक्षणिक पद्धतीशी सांगड घालताना या मुलांमधील क्रीडा नैपुण्य मारले जात आहे असे माझ्या पाहणीत आले आहे. लहान वयात स्पर्धात्मक तांत्रिक प्रशिक्षण देण्याऐवजी त्यांना खेळाचा निखळ आनंद कसा मिळेल यावर भर दिला पाहिजे. हळूहळू या खेळाची गोडी त्यांच्यात निर्माण झाल्यानंतर त्यांना खेळाची तांत्रिक माहिती दिली पाहिजे.
  भारतामधील प्रशिक्षण पद्धतीत त्रुटी आहे काय?
होय, येथील प्रशिक्षण पद्धत सदोष आहे. मैदानावर प्रथमच खेळणाऱ्या मुलाकडून लगेचच गोल होण्याची अपेक्षा धरणे चुकीचे आहे. प्रथम त्याला चेंडूवर कसे नियंत्रण ठेवता येईल, हे शिकविले पाहिजे. हळूहळू तो गोल करण्याच्या अचूकतेमध्ये हुकमी खेळाडू होईल. भारतामधील प्रशिक्षकांनाच अद्ययावत प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. बार्सिलोना क्लबची एक उपशाखा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही शाखा म्हणजे एक अकादमीच असेल व त्याद्वारे नवोदित खेळाडूंना नियमित स्वरुपात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  तुमच्या प्रशिक्षण पद्धतीत तंदुरुस्तीपेक्षा खेळाच्या शैलीवर अधिक भर दिला जात आहे. त्याविषयी काय सांगता येईल?
शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहेच, पण त्यापेक्षाही खेळाची शैली अधिक महत्त्वाची आम्ही मानतो. एकदा ही शैली आत्मसात केली की तंदुरुस्ती आपोआपच साधली जाते असे आम्ही मानतो. बार्सिलोना क्लबमध्येही आम्ही शैलीवरच अधिक भर देत असतो. कालांतराने शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीकडेही लक्ष दिले जाते.
  भारतात फुटबॉलमध्ये करीअर करण्याची खरोखरीच संधी आहे काय?
भारतात क्रिकेटची अफाट लोकप्रियता आहे असे मी ऐकले आहे. मात्र फुटबॉलविषयीही भरपूर लोकप्रियता मी पाहिली आहे. लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड आदी अनेक परदेशी क्लबतर्फे भारतात प्रशिक्षण योजना सुरू झाल्या आहेत. त्यामुळे फुटबॉलमध्येही करिअरच्या येथे चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आमच्या क्लबतर्फेही उदयोन्मुख खेळाडूंना दरमहा शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football training in pleasant moment antoni claveria
First published on: 14-11-2012 at 03:56 IST