अफगाणिस्तानचा माजी कप्तान असगर अफगाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज रविवारी आयसीसी टी-२० विश्वचषकात तो नामिबियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. ३३ वर्षीय अफगाणने ६ कसोटी, ११४ एकदिवसीय सामने खेळले. त्याने ७५ टी-२० सामन्यांमध्येही प्रतिनिधित्व केले आहे. सर्व प्रकारात त्याने ४२१५ धावा केल्या आहेत. त्याने ११५ सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व केले आहे.
२०१८ मध्ये भारताविरुद्ध पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा तो पहिला कसोटी कप्तान होता. त्याने कसोटी संघाचे नेतृत्व करत असताना दोन विजय आणि दोन पराभव पत्करले. कर्णधार म्हणून ५९ एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणने ३४ विजय आणि २१ पराभव पत्करले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० कर्णधार म्हणून त्याने ५२ पैकी ४२ सामने जिंकले आहेत. अफगाणने २००९ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले आणि २०१० मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण केले.
अफगाणने कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम रचला आहे. या वर्षी मार्चमध्ये अफगाणिस्तानने अबुधाबी येथे झिम्बाब्वेचा पराभव केला, यात अफगाणने महेंद्रसिंह धोनीला (४१ विजय) मागे टाकले. त्याच्या नावावर टी-२०मध्ये एका कर्णधारासाठी (४६) सलग सामने खेळण्याचा विक्रमही आहे.
हेही वाचा – BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं ‘मोठं’ वक्तव्य; म्हणाला, ‘‘भारत-न्यूझीलंड…”
२०१५ च्या विश्वचषकानंतर मोहम्मद नबीच्या जागी अफगाणची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि चार वर्षे त्याने हे पद सांभाळले. २०१९च्या विश्वचषकापूर्वी त्याच्या जागी गुलबदिन नैबची कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. डिसेंबर २०१९ मध्ये, अफगाणने कर्णधार म्हणून त्याचा दुसरा कार्यकाळ सुरू केला परंतु या वर्षी मे मध्ये त्याला पुन्हा एकदा काढून टाकण्यात आले. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये अफगाणिस्तानने आतापर्यंत गट २ मध्ये एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला आहे. ते अपराजित पाकिस्तानच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहेत.