सध्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलत आहेत. अनेकांनी आपण समलैंगिक असल्याचाही खुलासा केला आहे. यामध्ये आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू हीथ डेव्हिसचादेखील समावेश झाला आहे. डेव्हिसने पहिल्यांदाच सार्वजनिकपणे आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडचा पहिला समलैंगिक क्रिकेटपटू ठरला आहे.

ईएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार, डेव्हिसची गणना न्यूझीलंडच्या सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये होते. ५० वर्षीय डेव्हिसने १९९४ ते १९९७ दरम्यान न्यूझीलंडसाठी पाच कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने खेळले होते. हीथ डेव्हिसने वयाच्या ३२व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला होता. तो सध्या न्यूझीलंडऐवजी ऑस्ट्रेलियात राहत आहे.

हेही वाचा – Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसिम जाफरची सोशल मीडियावर धूम; मीम्सवर चाहते खुश

एका मासिकाशी झालेल्या संवादात त्याने आपण समलिंगी असल्याचा खुलासा केला आहे. ‘द स्पिन ऑफ’ नावाच्या या मासिकाला हीथने सांगितले की, ‘मला वाटते की ही गोष्ट माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मी ती इतकी वर्षे लपवून ठेवली होती. मी समलिंगी असण्याचा विचार माझ्या आयुष्यातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. आतापर्यंत मी एकटा होतो.’

हीथ म्हणाला, ‘मी समलैंगिक आहे हे ऑकलंडमध्ये जवळपास सर्वांनाच माहीत होते. संघातील लोकांनाही याची जाणीव होती. मी स्वत:ला स्वतंत्रही समजत होतो. पण, मी स्वत: जाहीरपणे याबाबत बोललो नव्हतो. आता मला तो माझ्या आयुष्याचा एक भाग वाटतो. त्यामुळे मी त्याबद्दल मनमोकळे बोलत आहे”