दुबई : भारतीय संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान रविवारी संपुष्टात आले. न्यूझीलंडने दमदार विजयासह अफगाणिस्तान आणि भारताला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्या ‘आयसीसी’ जेतेपदाचा शोध अद्याप कायम आहे.
अव्वल-१२ फेरीतील सुरुवातीच्या दोन सामन्यांत अनुक्रमे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी भारताला धूळ चारली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडवर मोठय़ा फरकाने विजय मिळवून भारताने निव्वळ धावगती उंचावत आव्हान शाबूत राखले. मात्र भारताच्या पुढील वाटचालीसाठी अफगाणिस्तानने न्यूझीलंडला नमवणे गरजेचे होते. तसे न झाल्यामुळे भारताला २०१२च्या विश्वचषकानंतर प्रथमच उपांत्य फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागत आहे. त्याशिवाय २००७नंतर दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावण्यातही ते अपयशी ठरले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय तसेच परदेशातील माजी खेळाडूंनी भारताच्या कामगिरीचे विच्छेदन केले.
फलंदाजांमुळे गाशा गुंडाळला!
ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताच्या सुमार कामगिरीमागील प्रमुख कारण म्हणजे फलंदाजी. प्रारंभीच्या दोन्ही लढतींमध्ये फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक खेळ केल्याने गोलंदाजांसह सर्व चाहत्यांचेही मन दुखावले. त्यामुळे क्षेत्ररक्षणावेळी आपल्या खेळाडूंची देहबोलीसुद्धा खालावलेली होती. पाकिस्तानविरुद्ध दवाने निर्णायक भूमिका बजावल्याचे मान्य आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या १११ धावा केल्यावर तुम्ही गोलंदाजांकडून काय अपेक्षा करणार? अशा वेळी दवाच्या घटकाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे फलंदाजांचे अपयश भारताला महागात पडले असून आता नव्याने संघबांधणी करण्याची गरज आहे. – सुनील गावस्कर
पुढील विश्वचषक जिंकून दाखवावा!
जगज्जेते संघ कधीच नशिबावर विसंबून राहत नाहीत. ते मेहनतीच्या बळावर निकाल आपल्या बाजूने फिरवतात. पहिल्या दोन लढती गमावल्यावरच भारत स्पर्धेबाहेर जाणार, हे जवळपास स्पष्ट झाले होते; परंतु आपण तरीही अफगाणिस्तान-न्यूझीलंड लढतीची प्रतीक्षा करत राहिलो. मात्र आता जे झाले ते मान्य करून पुढे जाण्याची गरज आहे. चाहत्यांनीसुद्धा या काळात खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करण्यापेक्षा त्यांना पाठिंबा द्यावा. विश्वचषकातील सुमार कामगिरीवरून खेळाडूंचे आकलन करू नये. पुढील विश्वचषकात नशिबावर विसंबून न राहता स्वबळावर भारताने जेतेपद मिळवून दाखवल्यास सर्वाना या कामगिरीचा आपोआप विसर पडेल. – गौतम गंभीर</strong>
खेळाडूंनी देशाला प्राधान्य द्यावे!
खेळाडूंनी ‘आयपीएल’ खेळण्यापेक्षा देशाला साहजिकच प्राधान्य दिले पाहिजे. अनेक खेळाडू आर्थिक कमाईसाठी महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळतात. यादरम्यान त्यांना दुखापत होते किंवा त्यांचे मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडते. याचा फटका राष्ट्रीय संघाला पडतो. त्यामुळे यापुढे ‘आयपीएल’चे आयोजन करताना ‘बीसीसीआय’ने याविषयी काळजी घ्यावी. विश्वचषक आणि ‘आयपीएल’मध्ये दोन आठवडय़ांचे अंतर नक्कीच हवे होते. – कपिल देव
बेधडक वृत्तीची भारताला गरज!
‘आयसीसी’ स्पर्धामध्ये तुम्हाला पहिल्या चेंडूपासूनच नैसर्गिक आणि बेधडक खेळ करणे गरजेचे आहे. यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताच्या खेळात ही वृत्ती दिसलीच नाही. त्यांच्याकडे असंख्य कौशल्यवान क्रिकेटपटू आहेत, यात शंका नाही; परंतु तुम्ही प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने खेळ केला नाही, तर मग आपोआपच दडपण वाढत जाते. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारत एकाच रणनीतीने विश्वचषकात खेळणार असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी रणनीती तयार नसल्याने पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. भारत स्पर्धेबाहेर गेल्याने मलाही धक्का बसला आहे.– नासिर हुसैन