पॅरिस : कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या किलियन एम्बापेच्या दोन गोलच्या बळावर फ्रान्सने युरोपीय अजिंक्यपद फुटबॉल २०२४ च्या पात्रतेच्या सामन्यात नेदरलँड्सवर ४-० असा मोठा विजय मिळवला.

गेल्या वर्षी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला मिळणाऱ्या ‘गोल्डन बूट’ पुरस्काराचा मानकरी एम्बापेने नव्या वर्षांतही आपला गोलधडाका कायम राखला. विश्वचषकानंतर ह्युगो लॉरिसने निवृत्ती पत्करल्यानंतर एम्बापेची फ्रान्सच्या कर्णधारपदी निवड झाली. त्याने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अप्रतिम खेळ केला.

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यावर फ्रान्सने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. दुसऱ्याच मिनिटाला एम्बापेच्या साहाय्याने अ‍ॅन्टोन ग्रीझमनने फ्रान्ससाठी पहिला गोल केला. आठव्या मिनिटाला दायोत उपामेकानो, तर २१व्या मिनिटाला एम्बापेने केलेल्या गोलमुळे मध्यंतराला फ्रान्सकडे ३-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात नेदरलँड्सच्या बचाव फळीने फ्रान्सचे आक्रमण काही अंशी रोखले. परंतु ८८व्या मिनिटाला एम्बापेने वैयक्तिक दुसरा गोल करताना फ्रान्सला ४-० असा विजय मिळवून दिला. अन्य सामन्यात, चेक प्रजासत्ताकने पोलंडवर ३-१ अशी मात केली.

लुकाकूची हॅट्ट्रिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तारांकित आघाडीपटू रोमेलू लुकाकूच्या हॅट्ट्रिकच्या बळावर बेल्जियमने युरो पात्रतेच्या सामन्यात स्वीडनला ३-० असे नमवले. लुकाकूने पूर्वार्धात ३५ व्या, तर उत्तरार्धात ४९ आणि ८२ व्या मिनिटाला गोल नोंदवले. या सामन्यात स्वीडनने ४१ वर्षीय आघाडीपटू झ्लाटान इब्राहिमोव्हिचला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरवले. युरो पात्रतेच्या सामन्यात खेळणारा इब्राहिमोव्हिच दुसरा सर्वात वयस्क खेळाडू ठरला.