स्वीडनविरुद्ध पराभवाने ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानी
माजी विजेत्या फ्रान्सने पुढील वर्षी रशियात होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याचा मार्ग स्वत:हून कठिण बनवला. युरोप विभागातील ‘अ’ गटातून अव्वल स्थान पटकावत फ्रान्सला रशियाचे तिकीट मिळवण्याची सोपी संधी होती, परंतु शनिवारी झालेल्या लढतीत स्वीडनने नाटय़मयरीत्या फ्रान्सला २-१ असे नमवून गटात अव्वल स्थान पटकावले. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात १-१ असा बरोबरीत असलेल्या या सामन्याला स्वीडनच्या ओला टोइव्होनेन याने नाटय़मय वळण दिले. त्याने भरपाई वेळेत फ्रान्सचा गोलरक्षक ह्य़ुगो लोरीसला चकवून निर्णायक गोल करताना स्वीडनला २-१ असा विजय मिळवून दिला. स्वीडनसाठी पहिला गोल जिम्मी डुर्मेझ (४३ मि.) आणि फ्रान्ससाठी एकमेव गोल ऑलिव्हर जिरुड (३७ मि.) याने केला.
‘अ’ गटात स्वीडन आणि फ्रान्स यांच्या खात्यात सहा सामन्यांत प्रत्येकी १३ गुण आहेत, परंतु स्वीडन अव्वल स्थानावर विराजमान आहे. या गटात प्रत्येक संघाचे अजून चार सामने शिल्लक असून स्वीडनच्या या भरारीने फ्रान्सला धक्का बसला आहे.
प्रत्येक गटातील अव्वल संघाला रशियात थेट प्रवेश मिळणार आहे, तर दुसऱ्या स्थानावरील नऊपैकी आठ सर्वोत्तम संघांना प्ले-ऑफ लढतीतून पात्रता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. १९९८च्या विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा पुढील सामना ३१ ऑगस्टला नेदरलॅण्ड्सविरुद्ध होणर आहे. नेदरलॅण्ड्सने ५-० अशा फरकाने लक्सेम्बर्गवर मात करून गुणतालिकेत आगेकूच केली आहे.
रोनाल्डोचा झंझावात, पोर्तुगाल विजयी
‘ब’ गटात अव्वल स्थानासाठी स्वित्र्झलड आणि पोर्तुगाल यांच्यात चांगलीच चुरस रंगताना पाहायला मिळत आहे. स्वित्र्झलडने (१८) तीन गुणांच्या आघाडीसह अग्रस्थान निश्चित केले आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर परतलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलाच्या जोरावर पोर्तुगालने शनिवारी लॅटव्हियावर ३-० असा विजय मिळवला. रोनाल्डोने ४१ व ६३ मिनिटाला गोल केला. रोनाल्डोच्या पासवर अॅण्ड्रे सिल्व्हाने ६७व्या मिनिटाला तिसरा गोल केला.