पॅरिस : जगज्जेतेपदानंतर सुमार कामगिरी करणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी विजयी सलामी नोंदवली. पाचव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचा सहजपणे अडथळा पार केला.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला गेल्या तीन स्पर्धामध्ये दुसऱ्या फेरीचाही अडथळा पार करता आला नव्हता. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सिंधूने आश्वासक खेळ करत मिशेल हिला २१-१५, २१-१३ असे नमवत आगेकूच केली आहे. सिंधूचा मिशेलविरुद्धचा हा पाचवा विजय ठरला आहे. सिंधूला दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या सिंगापूरच्या येओ जिया मिन हिच्याशी लढत द्यावी लागेल.

भारताच्या शुभंकर डे याने इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तो याचे आव्हान परतवून लावत दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे. जागतिक क्रमवारीत ४२व्या स्थानी असलेल्या शुभंकरने १७व्या क्रमांकावरील सुगिआर्तोला १ तास १८ मिनिटे रंगलेल्या लढतीत १५-२१, २१-१४, २१-१७ असे हरवले.

साईप्रणीतची ११व्या स्थानी झेप

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणीतने एका क्रमांकाने मुसंडी मारत कारकीर्दीतील सर्वोत्तम ११व्या स्थानी झेप घेतली आहे. जगज्जेत्या  सिंधूने आपले सहावे स्थान कायम राखले आहे. किदम्बी श्रीकांतच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो १०व्या स्थानी पोहोचला आहे.