जागतिक क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या दोन मातब्बर टेनिसपटूंमधील द्वंद्व चाहत्यांना शुक्रवारी पाहायला मिळालं. फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचने रोलँड गॅरोस अर्थात फ्रेंच ओपन पुरूष एकेरीचं १३ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालचा पराभव केला. या विजयाबरोबरच जोकोव्हिचने ‘फ्रेंच ओपन’च्या अंतिम फेरीत धडक मारली.

फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरूष एकरेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात लढत झाली. जोकोव्हिचने १३ वेळा फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावणाऱ्या नदालचा पराभव केला. या विजयाबरोबरच जोकोव्हिच रोलँड गॅरोस अर्थात फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालचा दुसऱ्यांदा पराभव करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. क्ले कोर्टवर चार तास चाललेल्या या दुसऱ्या उपांत्य सामन्यात जोकोव्हिचने नदालचा ३-६,६-३, ७-६, ६-२ अशा फरकाने पराभूत केलं.

हेही वाचा-फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: त्सित्सिपासची मुसंडी; पाच सेटमध्ये संघर्षपूर्ण विजय 

२००५ मध्ये पदार्पण केल्यापासून नदालचा हा क्ले कोर्टवरील पराभव ठरला. आतापर्यंत नदालला क्ले कोर्टवर तीन वेळाच पराभव पत्करावा लागला आहे. तर दुसरीकडे हा सामना जिंकत जोकोव्हिचने नदालला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. जोकोव्हिच पाचव्यांदा फ्रेंच ओपन पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०१६ मध्ये जोकोव्हिचने स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्या सेटमध्ये विजय मिळवल्यानंतर पराभव होण्याची नदालची ही पहिलीच वेळ ठरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंतिम फेरीत स्टेफानोस त्सित्सिपास लढत

पुरुष एकेरीच्याच दुसऱ्या उपांत्य फेरीत नदालचा पराभव करत अंतिम फेरीत दाखल झालेल्या जोकोव्हिचची अंतिम फेरीत स्टेफानोस त्सित्सिपासशी लढत होणार आहे. त्सित्सिपास याने पहिल्या उपांत्य फेरीत जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह याचा पराभव केला आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो ग्रीसचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. त्यामुळे जोकोव्हिच आणि त्सित्सिपासशी यांच्यात होणाऱ्या लढतची सगळ्यांनाच उत्सुकता असणार आहे.