महिला गटात कसात्किना, स्टीफन्सचे विजय
वृत्तसंस्था, पॅरिस
तिसऱ्या मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष गटाच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात विजय मिळवत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. या गटाची पुढची फेरी गाठताना ब्रिटनच्या कॅमेरुन नॉरीला संघर्ष करावा लागला. तर, फॅबियो फॉगनिनीने धक्कादायक निकालाची नोंद करताना पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. महिला एकेरीत दारिया कसात्किना व स्लोअन स्टीफन्स यांनीही पुढची फेरी गाठली.
जोकोव्हिचने अमेरिकेच्या अलेक्झांडर कोव्हासेव्हिचला ६-३, ६-२, ७-६ (७-१) असे पराभूत केले. दुसऱ्या फेरीत जोकोव्हिचसमोर हंगेरीच्या मार्कस फुक्सोव्हिक्सचे आव्हान असेल. सामन्यातील पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर जोकोव्हिच तिसरा सेट सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये कोव्हासेव्हिचने जोकोव्हिचसमोर आव्हान उपस्थित केले. हा सेट ‘टायब्रेकर’पर्यंत गेला. मात्र, तिथे जोकोव्हिचने आक्रमक खेळ करत कोव्हासेव्हिचला पुनरागमनाची संधी दिली नाही.




पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात नॉरीने चुरशीच्या सामन्यात फ्रान्सच्या बेनोइट पेरेवर पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत ७-५, ४-६, ३-६, ६-१, ६-४ असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला. नॉरीने पहिला सेट जिंकल्यानंतर पेरेने पुढचे दोन्ही सेट जिंकत आघाडी मिळवली. नंतर, चौथ्या व पाचव्या सेटमध्ये पेरेने खेळ उंचावत विजय साकारला. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर फ्रान्सच्या लुकास पॉइलेचे आव्हान असेल. तर, इटलीच्या फॉगनिनीने दहाव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अॅलिसिमेला ६-४, ६-४, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. स्पेनच्या रॉबर्ट बटिस्टा अगुटने चीनच्या वु यिबिंगला ७-६ (७-४), ६-१, ६-१ असे नमवले.
महिला एकेरीच्या लढतीत नवव्या मानांकित कसात्किनाने जर्मनीच्या ज्युल निमेयरला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. कसात्किनाचा सामना दुसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोव्हाशी होईल. अन्य लढतीत, स्टीफन्सने १६व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाला ६-०, ६-४ असे नमवले. तर, अमेरिकेच्या मेडिसन कीजने एस्टोनियाच्या काइआ कानेपिला ६-१, ३-६, ६-१ असे पराभूत केले.