जयेश राणे, आशुतोष मेहता यांचे मोलाचे योगदान

मुंबईपासून पूर्वेला जवळपास साडेतीन हजार किलोमीटर दूर असलेल्या ऐझॉल शहरात मागील रविवारी जत्रा भरली होती. मिझोराम राज्याची राजधानी असलेल्या ऐझॉलमध्ये फुटबॉल ज्वर चढले होते. तसाच ज्वर मुंबईतील फुटबॉलबहुल भागांमध्येही पाहायला मिळत होता. आय-लीग फुटबॉल स्पध्रेत मुंबईचा संघ तळाला असूनही मुंबईत सुरू असलेल्या या जल्लोषाचे कारण काही केल्या उमगेना.. पण, ऐझॉलच्या ऐतिहासिक विजेतेपदानंतर त्यामागचा उलगडा झाला. जयेश राणे आणि आशुतोष मेहता हे मुंबईचे खेळाडू ऐझॉलच्या विक्रमी जेतेपदाचे वाटेकरी होते. पूर्वाचलातील क्लबच्या जेतेपदात त्यांचाही वाटा होता आणि म्हणून ३५५५ किलोमीटर दूर असलेल्या ऐझॉलच्या जेतेपदाच्या जल्लोषाचा नाद मुंबईतही घुमत होता. मुंबई आणि ऐझॉल यांच्यात भौगोलिक, भाषिक, प्रांतिक आणि सांस्कृतिक विविधता असूनही ‘फुटबॉल’ या एका नात्याने रविवारी ही दोन शहरे एकमेकांनजीक आले.

‘‘ऐझॉलमध्ये सुरुवातीला सावरण्यासाठी बरीच अडचण झाली, परंतु येथील लोकांनी आम्हाला सामावून घेतले. त्यांच्यातील फुटबॉलप्रेम पाहून आम्हीही भारावून गेलो आणि त्यामुळेच येथे स्थिरावण्यास आम्हाला फार काळ लागला नाही,’’ अशी प्रतिक्रिया जयेश व आशुतोष यांनी दिली. मुंबईकर असलेल्या या दोन्ही खेळाडूंमधली मैत्री इतकी घट्ट आहे की, एकाने ऐझॉलकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याबरोबर दुसऱ्यानेही लागोलाग ऐझॉलची वाट धरली. ‘‘ऐझॉल शहराबाबत आणि क्लबबाबत आम्हाला माहीत नव्हते असे नाही, परंतु या क्लबकडून कधी खेळेन असा विचारही केला नव्हता. आत्तापर्यंत ते केवळ मिझोरामच्या खेळाडूंसोबतच  खेळत होते. त्यामुळे या संघाचा भाग होण्याची संधी मिळाल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांच्यासोबत खेळण्याचा हा माझा आणि आशुतोषचा निर्णय होता,’’ असे जयेश सांगतो. जयेशने १८ सामन्यांत ऐझॉलचे प्रतिनिधित्व करताना दोन सुरेख गोल केले.

दूर डोंगरदऱ्यांमध्ये पर्यटन म्हणून फिरणे आणि तेथे राहून स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणे, यात मोठा फरक आहे आणि ही तारेवरची कसरत जयेश व आशुतोषने यशस्वीरीत्या पार केली. ‘‘मुंबई आणि ऐझॉल यात बरीच विविधता आहे. येथील लोकांच्या मी प्रेमात पडलो. त्यांच्यातील फुटबॉलची आवड पाहून काहीसे थक्क व्हायला झाले. आमच्या विजयाचे ते प्रेरणास्रोत आहेत आणि त्यांच्यासाठीच आम्हाला ही लीग जिंकायची होती. आमचे स्वप्न सत्यात अवतरले. कुणालाही वाटले नव्हते आम्ही जिंकू, परंतु आम्ही सर्वाना चुकीचे ठरविले,’’ असे जयेश म्हणाला.

मिझोरामचे लोक या जेतेपदाचे प्रमुख हकदार

‘‘हा प्रवास अविश्वसनीय होता. विजयाच्या त्या आनंदोत्सवातून अजूनही बाहेर पडलेलो नाही. भारतीय फुटबॉल क्षेत्रात आम्ही इतिहास घडविला आहे. आम्ही घेतलेल्या कठोर परिश्रमाचे हे चीज आहे,’’ असे मत आशुतोषने व्यक्त केले. २१ वर्षीय आशुतोषचा जन्म सुरत येथील असला तरी त्याची फुटबॉल कारकीर्द मुंबईत बहरली. ऐझॉलमध्ये खेळण्याचा निर्णय आव्हानात्मक होता, असे आशुतोष सांगतो. तो म्हणाला, ‘‘हा निर्णय आव्हानात्मक होता. सुरुवातीच्या काही दिवस आमच्यासाठी खडतर होते. येथील वातावरण, लोक, खाद्य, संस्कृती, जीवनशैली सर्व काही वेगळे होते. मात्र येथील लोकांनी आम्हाला वेगळेपण जाणवू दिले नाही. त्यांनी आम्हाला आपलेसे केले आणि म्हणून आम्ही घरापासून दूर आहोत, असे कधी जाणवले नाही.’’

शिलाँगमध्ये जेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मिझोराममध्ये परतल्यावर पाहिलेले दृश्य थक्क करणारे होते. शेकडो लोक खेळाडूंच्या स्वागतासाठी विमानतळावर आली होती. स्टेडियमच्या बाजूला असलेल्या थोटय़ाशा टेकडय़ांवरही अभिनंदनाचे फलक घेऊन लोक उभी होती. त्यामुळे हा विजय म्हणजे मिझोरामच्या लोकांसाठी काय आहे, असा सवाल विचारल्यास आशुतोष म्हणाला, ‘‘मिझोरामच्या लोकांसाठी या जेतेपदाचे किती महत्त्व आहे, हे शब्दात सांगू शकत नाही. इतर कुणापेक्षा मिझोरामचे लोक या जेतेपदाचे अधिक हकदार आहेत. मिझोराम सरकारने तो दिवस सुट्टीचा जाहीर केला. यावरून अंदाज येईल की येथे फुटबॉल किती महत्त्वाचा आहे.’’

आयएसएल आणि आय-लीग विलीनीकरणाच्या प्रस्तावामुळे ही अखेरची स्पर्धा असू शकते. त्यानंतर ऐझॉलचे भविष्य काय आणि आयएसएलमध्ये सहभागी झाल्यास ते कामगिरीत सातत्य राखू शकतील का, यावर तो म्हणाला, ‘‘फुटबॉलमध्ये सर्व काही शक्य आहे.’’

प्रशिक्षक खालीद जमीलही मुंबईकर

ऐझॉल क्लबच्या युवा खेळाडूंना सोबत घेऊन जेतेपद पटकावणाऱ्या प्रशिक्षक खालीद जमील यांचेही मुंबईशी अतूट नाते आहे. कुवैतमध्ये जन्मलेल्या खालीद यांची फुटबॉल कारकीर्द १९९७ ते २००९ पर्यंत. मुंबईच्या विविध क्लबचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. २००९ ते २०१६ पर्यंत ते मुंबई क्लबचे प्रशिक्षकही होते.

हे जेतेपद मिझोरामवासीयांचेच

‘‘हा प्रवास अविश्वसनीय होता. विजयाच्या त्या आनंदोत्सवातून अजूनही बाहेर पडलेलो नाही. भारतीय फुटबॉल क्षेत्रात आम्ही इतिहास घडविला आहे. आम्ही घेतलेल्या कठोर परिश्रमाचे हे चीज आहे,’’ असे मत आशुतोषने व्यक्त केले. २१ वर्षीय आशुतोषचा जन्म सुरत येथील असला तरी त्याची फुटबॉल कारकीर्द मुंबईत बहरली. ऐझॉलमध्ये खेळण्याचा निर्णय आव्हानात्मक होता, असे आशुतोष सांगतो. तो म्हणाला, ‘‘हा निर्णय आव्हानात्मक होता. सुरुवातीच्या काही दिवस आमच्यासाठी खडतर होते. येथील वातावरण, लोक, खाद्य, संस्कृती, जीवनशैली सर्व काही वेगळे होते. मात्र येथील लोकांनी आम्हाला वेगळेपण जाणवू दिले नाही. त्यांनी आम्हाला आपलेसे केले आणि म्हणून आम्ही घरापासून दूर आहोत, असे कधी जाणवले नाही.’’