Puneri Paltan Pro Kabaddi Player Dadaso Pujari: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा हा प्रामुख्याने फुटबॉल आणि कुस्तीसाठी ओळखला जातो. पण या जिल्ह्याने अनेक कबड्डीपटू देखील दिले आहेत. जे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि प्रो कबड्डी लीग स्पर्धेत चमकले. या खेळाडूंच्या यादीत आता दादासो शिवाजी पुजारीचं नाव देखील जोडलं गेलं आहे. मुर्ती लहान पण किर्ती महान अशी या खेळाडूची ओळख. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी दादासोने भल्याभल्या खेळाडूंना घाम फोडला आहे. दरम्यान दादासो पुजारीचा कबड्डीचा प्रवास कसा सुरू झाला? जाणून घ्या.
कबड्डीपटूला खरी ओळख ही आपल्या स्थानिक कबड्डी क्लबकडून खेळताना मिळत असते. दादासोचा जन्म २ ऑगस्ट २००४ ला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील शिरोली या गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील शिवाजी पुजारी हे पेशाने शेतकरी आहेत. दादासोचे भाऊ देखील कबड्डी खेळायचे. त्यांना खेळताना पाहून दादासोला कबड्डी खेळायची आवड निर्माण झाली. दादासोची कबड्डीची सुरूवात शिवराय कबड्डी क्लबमधून झाली. प्रशिक्षक उत्तम गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कबड्डीचे धडे गिरवायला सुरूवात केली. मोठ्या भावाला खेळताना पाहून कबड्डीची आवड निर्माण झाली आणि ही आवड कधी करिअर बनली हे कळालंच नाही, असं दादासो सांगतो.
प्रत्येक यशस्वी खेळाडूच्या मागे कोणाची तरी मेहनत असते. ज्यावेळी दादासो गावातील चौरंगी स्पर्धा (वजनी गटातील कबड्डी स्पर्धा) खेळायचा. त्यावेळी गावकरी आणि मोठी मंडळी दादासोच्या वडिलांना म्हणायचे की,याला काहीतरी करू द्या. गावात फिरण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. पण वडिलांना दादासोवर पूर्ण विश्वास होता. दादासो ज्या अॅकेडमीत प्रशिक्षण घेण्यासाठी जायचा, त्या अॅकेडमीची फी १० हजार रूपये होती. १० हजार खूप जास्त होते, पण वडिलांनी त्याला सांगितलं की, तू फक्त कबड्डीकडे लक्ष दे.
दादासोने राव कबड्डी अॅकेडमीत कबड्डीचं शिक्षण घेतलं. इथे रमेश भेंडगिरी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याला कबड्डीतील बारीकसारीक गोष्टी शिकून घेण्याची संधी मिळाली. ही अॅकेडमी दादासोच्या घरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर होती. पण कबड्डीवरून दुर्लक्ष होऊ नये, म्हणून तो घरी जाणं टाळायचा. आपल्या वडिलांबाबत सांगताना दादासो म्हणाला, “घरची परिस्थिती चांगली होती. पण मी ज्या अॅकेडमीत जायचो, त्याची फी महिन्याला १० हजार रुपये इतकी होती. १० हजार जरा जास्त होते. पण वडिल म्हणाले, तू खेळ मी आहे. मी कबड्डी खेळावं यासाठी आई-वडिलांनी खूप सपोर्ट केला. वडिलांनी मला आधीपासून सांगितलं होतं की,तू इतर गोष्टींकडे लक्ष देवू नकोस. फक्त कबड्डीवर लक्ष दे. त्यामुळे मी घरी न येता अॅकेडमीत राहायचो.”असं जिओस्टारने आयोजित केलेल्या चर्चासत्रात दादासो पुजारी म्हणाला.
वरिष्ठ खेळाडूंकडून मिळणारे सल्ले
दादासो पुजारी प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटन संघाचं प्रतिनिधित्व करतो. उजवा कोपरा सांभाळणाऱ्या दादासोला या संघाकडून खेळताना सातत्याने संधी दिली जात आहे. याआधी युवा पलटन संघाकडून खेळताना त्याला पंकज मोहिते आणि अस्लम इनामदार सारख्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. या खेळाडूंसोबत खेळतानाचा अनुभव कसा होता? याबाबत सांगताना दादासो पुजारी म्हणाला, ” अस्लम दादासोबत युवा पटलनमध्येही खेळण्याची संधी मिळाली आहे. तो नेहमी आपला अनुभव शेअर करत असतो.
