भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे मत

मुंबई : विराट कोहलीच्या कर्णधारपदाप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने निवड समितीच्या वतीने भाष्य करायला नको होते. त्यामुळे वाद निर्माण झाला, असे मत भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे.

‘बीसीसीआय’कडून कुणीही मला ट्वेन्टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडू नको, असे सांगितले नव्हते, असे दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले. परंतु कोहलीशी कर्णधारपदाबाबत चर्चा झाल्याचे गांगुलीने म्हटले होते.

‘‘गांगुली हा ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष आहे. संघ किंवा कर्णधारपदाची निवड हे विषय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या अखत्यारित येतात. शर्मा यांनी यासंदर्भात मत मांडायला हवे होते,’’ असे वेंगसरकर यांनी सांगितले.

वेंगसरकर मुंबईचे प्रेरक?

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना येत्या रणजी क्रिकेट हंगामासाठी प्रेरक म्हणून नेमण्याचा प्रस्ताव मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. सय्यद मुश्ताक अली करंडक आणि विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धांमध्ये अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आल्यामुळे हा प्रस्ताव ठेवण्यात आला. ‘एमसीए’चे कोषाध्यक्ष जगदीश आचरेकर यांनी अध्यक्ष विजय पाटील यांना ई-मेलद्वारे हा प्रस्ताव ठेवला.