सेरेना विल्यम्स आणि जेतेपदे हे शब्द आता समानार्थी झाले आहेत. तिची बिनतोड सव्‍‌र्हिस टेनिसविश्वातल्या सर्वोत्तम सव्‍‌र्हिसमध्ये गणली जाते. तिच्या प्रत्येक विजयासह नवा विक्रम प्रस्थापित होतो. जिंकण्याचे सातत्य अंगी बाणवलेल्या सेरेनाच्या शक्तिप्रदर्शनासाठी विम्बल्डनचे व्यासपीठ सज्ज झाले आहे. एरव्ही अंतिम लढतीत सेरेना म्हटल्यावर एकतर्फी लढतीची अपेक्षा असते. मात्र यंदा सेरेनाच्याच गुणवैशिष्टय़ांसह खेळत अंतिम फेरी गाठणारी युवा गार्बिन म्युग्युरुझा सेरेनासमोर चांगली झुंज देईल अशी आशा आहे.
मारिया शारापोव्हाविरुद्ध सलग १७वा विजय नोंदवत सेरेनाने अंतिम फेरीत धडक मारली. कारकीर्दीतील एकेरीचे २१वे तर विम्बल्डनचे सहावे जेतेपद पटकावण्यासाठी सेरेना उत्सुक आहे. वाढते वय आणि दुखापतींचा ससेमिरा यांची तमा न बाळगता जिंकण्याच्या विलक्षण ऊर्जेने खेळणारी सेरेना महिला टेनिसमधील अपवाद आहे.
कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या गार्बिनला मानहानीकारक पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. स्पेनच्या मातीला साजेशी चिवट झुंज देण्याची वृत्ती, ताकदवान फोरहँडच्या फटक्याचे अस्त्र, जबरदस्त शारीरिक तंदुरुस्ती हे गार्बिनच्या वाटचालीचे रहस्य आहे. मात्र प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी दयामाया न दाखवता व्यावसायिक खेळ करत दणदणीत विजय मिळवणे, हेच सेरेनाचे उद्दिष्ट असते. २१ वर्षीय गार्बिनविरुद्धही विजयी मंत्र जोपासत इतिहास घडवण्यासाठी सेरेना सज्ज आहे. गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेत गार्बिननेच प्राथमिक फेरीत सेरेनाचे आव्हान संपुष्टात आणले होते. लाल मातीवरच्या त्या पराभवाची हिरव्यागार गवतावरच्या जेतेपदासह परतफेड करण्यासाठी सेरेना उत्सुक आहे.
spt04