राष्ट्रकुल स्पर्धेसाठी कसून सराव झाला आहे. तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आम्ही दहा दिवस आधीच ग्लासगो येथे रवाना होत आहेत. त्यामुळे सर्वोत्तम प्रदर्शनासह पदक पटकावणार आहे, असा विश्वास ज्युदोपटू गरिमा चौधरी हिने व्यक्त केला.
जेएसडब्ल्यूतर्फे पुढील वर्षी कर्नाटकमधील बेलारी येथे कुस्ती, बॉक्सिंग, ज्युदो, अ‍ॅथलेटिक्स आणि जलतरण या पाच क्रीडाप्रकारांसाठी अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. याविषयीच्या कार्यक्रमात पाच क्रीडापटू सहभागी झाले होते. लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव ज्युडोपटू गरिमा यावेळी म्हणाली, ‘‘लंडनचा अनुभव खूप काही शिकवणारा होता. कोणत्याही क्रीडापटूसाठी ऑलिम्पिकमध्ये खेळणे स्वप्न असते. माझे स्वप्न प्रत्यक्षात साकारले, पदक मिळू शकले नाही, मात्र हा अनुभव मोलाचा होता.’’
‘‘ऑलिम्पिकनंतर मला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त केले. योग्य उपचारानंतर मी त्यातून सावरले आहे. जेएसडब्ल्यूच्या सहकार्याने जॉर्जिया येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ४५ दिवस प्रशिक्षणाची संधी मिळाली. या कालावधीत खेळ सर्वसमावेशक करण्यावर भर दिला. काही दिवसांपूर्वीच भारतातही ज्युडोपटूंचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे तयारी उत्तम झाली आहे,’’ असे आत्मविश्वास उंचावलेल्या गरिमाने सांगितले.
ज्युदोपटू अवतार सिंगही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याविषयी तो म्हणाला, ‘‘मी सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करणार आहे. नशीबाने साथ दिली तर मी नक्कीच पदक मिळवेन. माझी तयारी चांगली झाली असून मी तंदुरुस्तही आहे.’’ती पुढे म्हणाली, ‘‘ज्युदोमध्ये माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया, फिनलँड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंचे आव्हान असणार आहे. गेल्या वर्षी मी अबू धाबी ग्रां. प्रि. शर्यतीत सातव्या स्थानावर मजल मारल्याने माझा आत्मविश्वास उंचावला आहे. या वेळी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.’’