कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरची टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघाला रविवारी सलग दुसऱ्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडपुढे शरणागती पत्करल्यामुळे भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यानंतरच विराटच्या नेतृत्वार पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं उपस्थित केली जाऊ लागली आहेत.

विराटने यापूर्वीच टी-२० विश्वचषकानंतर आपण टी-२० क्रिकेटमधील कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केलीय. द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने देदीप्यमान यश मिळवले. परंतु ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये संघाला जेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याने गोलंदाजीत केलेले बदल आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अनाकलनीय होती. नाणेफेकीचा कौलही कोहलीची साथ देत नाही. त्यामुळे त्याच्या नेतृत्वकौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

अशातच भारताचा माजी सालामीवीर गौतम गंभीरनेही विराटवर निशाणा साधला आहे. मैदानावर आरडाओरड करणं, प्रत्येक गोष्टीवर काहीतरी प्रतिक्रिया देणं, सैरभर पळणं यामधून हे सिद्ध होतं नाही की तुम्हाला खेळाबद्दल अधिक प्रेम (पॅशनेट) आहे, असा टोला गंभीरने लगावला आहे. गंभीरने विराट ज्यापद्धतीने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू बाद झाल्यावर आनंद साजरा करतो आणि प्रतिसाद देतो त्यावरुन टीका करताना अनेकदा परिस्थिती तणावपूर्ण असेल तर शांत राहणेही गरजेचे असते असं म्हटलं आहे.

“सामन्याच्या दिवशी स्पर्धेत भारत ज्या ठिकाणी (गुणतालिकेमध्ये) होता त्याच ठिकाणी न्यूझीलंडचा संघही होता. त्यामुळे त्यांच्यावरही भारताइतकाच दबाव होता. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सारं काही कर्णधारापासून सुरु होतं. न्यूझीलंडच्या बाबतीत हे थेट केन विल्यमसन आणि त्यांच्या शांतपणाशी संबंधित आहे,” असं गंभीरने ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटलं.

“तुम्ही सतत विरोधी संघाला काहीतरी करुन दाखवण्याची, प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. तुम्ही कायमच तुमच्या भावना मैदानात दाखवल्या पाहिजेत असं नाहीय. कधीतरी तुम्ही सकारात्मक आणि शांत राहणं हे संघाच्या दृष्टीने सकारात्मक पद्धतीने परिणामकारक ठरु शकतं. तुम्ही केवळ मैदानातील साऱ्या गोष्टींवर व्यक्त होत राहिल्याने तुम्हाला खेळाबद्दल फार प्रेम आहे असं होतं नाही,” असा टोला गंभीरने लगावला आहे.