भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवारीसंदर्भातील फेरविचार याचिका गुरुवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सांवत यांनी फेटाळली. यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतून मुंडे बाद झाले आहेत. मुंडेंची याचिका फेटाळल्यामुळे आता अध्यक्षपदासाठीचे एकमेव उमेदवार आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा विजय निश्चित झाला आहे.
दरम्यान, एमसीएच्या निर्णयाविरोधात आपण तातडीने शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले. शरद पवार यांनी क्रिकेट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय शिखर संस्थेचे अध्यक्षपद भूषविल्यानंतरही पुन्हा ते एमसीएचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी मैदानात उतरल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, असाही आरोप मुंडे यांनी यावेळी केला.
माझ्याविरोधात षड्यंत्र! मुंडेंचे पवारांवर शरसंधान
मुंडे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत पारपत्र, वीजबिल आणि दूरध्वनी बिल जोडले होते. या आधारावर आपण मुंबईचे कायमचे रहिवासी झाल्याचा युक्तिवाद मुंडे यांनी सावंत यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये दिलेल्या निर्णयात केवळ मतदार यादीमध्ये नाव असल्यास संबंधित उमेदवाराला त्या शहरातील कायमचा रहिवासी गृहीत धऱण्यात यावे, असे म्हटले होते. याच निकालाच्या आधारे मुंडे यांचा अर्ज आणि फेरविचार याचिका फेटाळण्यात आल्याचे सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.
मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याप्रकरणी बुधवारी एमसीएचे विद्यमान अध्यक्ष रवी सावंत यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी मुंडे आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार नितीन प्रधान यांनी आपले युक्तिवाद सादर केले. शरद पवार यांचे कायमस्वरूपी वास्तव्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बारामती आहे, त्यांनाही एमसीएच्या घटनेच्या कलम १७ अनुसार ही निवडणूक लढवता येणार नाही, असा दावा बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी करण्यात आला. याशिवाय घटनेतील कलम ६ अनुसार एखाद्या उमेदवाराबाबत त्याच पदाचा उमेदवार आक्षेप घेऊ शकतो. त्यामुळे हा आक्षेप फक्त पवारांनाच घेता आला असता. पण सी. पी. सिंघवी यांचा हरकत मांडणारा अर्ज मान्य करून मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवणे चुकीचे आहे. या पाश्र्वभूमीवर ही निवडणूकप्रक्रिया नव्याने व्हायला हवी, असे मत मुंडेंकडून मांडण्यात आले. तसेच पडताळणी झाली तेव्हा सिंघवी हजर राहण्याची आवश्यकता नव्हती. परंतु त्याची उमेदवाराला नोटीस देण्यात आली नव्हती, असे प्रधान यांनी सांगितले.