ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे मूळ गाव असलेल्या गोळेश्वर (ता. कराड) येथे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या नियोजित खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी राज्य शासनाने तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे.

राज्य शासनाने आठ वर्षांपूर्वी या कुस्ती संकुलाची घोषणा केली होती; परंतु अपुऱ्या निधीमुळे हे क्रीडा केंद्र उभारण्याची सुरुवातच झाली नव्हती. निधी वाढवून देण्याबाबत शासन उदासीन राहिल्याने खाशाबा यांचे पुत्र रणजित यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. रणजित यांनी खाशाबा यांना  ऑलिम्पिकमध्ये मिळालेले कांस्यपदक लिलावात काढण्याचा इशारा देऊन शासनाला धक्का दिला होता. त्यानंतर माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत आवाज उठवून १४ ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय खाशाबांच्या कुटुंबाला कळवण्याचे शासनाला आवाहन केले होते. खाशाबा यांच्या गावी गोळेश्वरला त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती संकुल व्हावे, यासाठी शासन आदेश आठ वर्षांपूर्वी जारी करण्यात आला होता.

दरम्यान, सोमवारी तातडीची बैठक होऊन यापूर्वीच्या शासन आदेशातील १ कोटी ५८ लाखांची तरतूद अपुरी असल्याचे मान्य करून सदर नियोजित संकुलासाठी तीन कोटी रुपये देण्याचा शासन निर्णय झाला. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी कुस्ती संकुलासाठी तीन कोटींचा निधी जाहीर केला. सोबतच खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा, यासाठी राज्य सरकार केंद्राला शिफारस करणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले, खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव हे उपस्थित होते.