जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील भारताची निराशाजनक कामगिरी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. गुरप्रीत सिंग याने कडवी लढत देऊनही त्याला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विक्टर नेमेस याच्याकडून पराभव पत्करावा लागला.
नवीन कुमारला क्युबाचा बॉक्सर आणि २०१८चा पॅन-अमेरिकन विजेता ऑस्कर पिनो याच्याकडून पहिल्याच फेरीत ०-९ असे पराभूत व्हावे लागले. पण पिनो याने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे नवीनला रिपिचेज फेरीद्वारे कांस्यपदक पटकावण्याची संधी आहे.
२०१७ च्या जगज्जेत्या विक्टरविरुद्ध खेळताना गुरप्रीतने ७७ किलो वजनी गटाच्या दुसऱ्या फेरीत १-० अशी आघाडी घेतली होती. सर्बियाच्या विक्टरविरुद्ध गुरप्रीतने आक्रमक खेळ करून पहिल्या फेरीअखेर ही आघाडी कायम राखली होती.
दुसऱ्या फेरीत अतिआक्रमतेमुळे गुरप्रीतने एक गुण गमावला. झटापटीदरम्यान विक्टरने गुरप्रीतला मॅटबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, अंतिम रेषेजवळ विक्टरचा तोल जाऊन तो गुरप्रीतच्या अंगावर पडला. पण तरीही पंचांनी विक्टरला दोन गुण बहाल केले. भारताचे प्रशिक्षक हरगोविंद सिंग यांनी या निर्णयाविरोधात दाद मागितली, पण पंचांनी विक्टरच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे गुरप्रीतला आणखी एक गुण गमवावा लागला. तिसऱ्या फेरीत विक्टरने ही आघाडी कायम टिकवत ३-१ अशा फरकासह आगेकूच केली.
तत्पूर्वी, गुरप्रीतने पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या मायकेल वॅगनर याला ६-० असे हरवले होते.