Gus Atkinson Century in ENG vs SL 2nd Test: श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या गस अॅटकिन्सनने शतक झळकावले आहे. लॉर्ड्सवर इंग्लंडच्या पहिल्या डावात ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गस अॅटकिन्सनने आपल्या संघासाठी जबरदस्त खेळी केली. गसने पहिल्या डावात अगदी टी-२० शैलीत फलंदाजी करत ११५ चेंडूत ४ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या. गसचे कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले शतक होते आणि त्याचे हे शतक ऐतिहासिक लॉर्ड्सवर त्याने केले.
अॅटकिन्सनच्या आधी जो रूटने इंग्लिश संघासाठी पहिल्या डावात १४३ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ४२७ धावा केल्या. गस हा इंग्लिश संघाचा वेगवान गोलंदाज आहे, पण लॉर्ड्सवर त्याने आश्चर्यकारक खेळी करत थेट शतक झळकावले आणि संघाने ४०० धावांचा टप्पा पार केला.
अॅटकिन्सनची टी-२० स्टाईल फलंदाजी
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवसापर्यंत इंग्लंड संघाने सात विकेट गमावून ३५८ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गस अॅटकिन्सन ७४ धावा करून नाबाद परतला. तर मॅथ्यू पॉट २० धावांवर खेळत होता. यानंतर दुसऱ्या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ॲटकिन्सनचे शतक आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारून ॲटकिन्सनने आपली आक्रमक शैली दाखवून दिली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला मैदानावरील पंचांनी बाद दिले. पण त्याने रिव्ह्यू घेतला आणि तो नाबाद राहिला. त्यानंतर अॅटकिन्सनने चौकार मारत १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. गस ऍटकिन्सनचे हे पहिलेच कसोटी शतक नाही तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधीलही पहिले शतक आहे.
अॅटकिन्सनने अजित आगरकरचा कित्ता गिरवला
इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर आठव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर शतक झळकावणारे केवळ ६ फलंदाज आहेत. यापूर्वी फक्त ५ फलंदाजांनी ही कामगिरी केली होती, आता या यादीत अॅटकिन्सनचे नाव जोडले गेले आहे. भारताच्या अजित आगरकरने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना या मैदानावर उत्कृष्ट शतक झळकावले होते. अजित आगरकरने हे शतक भारताच्या दुसऱ्या डावात आणि चौथ्या डावात केले.
अजित आगरकरने १०९ नाबाद धावा केल्या होत्या. या खेळीत आगरकरने १६ चौकार मारले होते. याआधी इंग्लंडच्या रे इलिंगवर्थने १९६९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध या मैदानात ११३ धावांची इनिंग खेळली होती. आता गस अॅटकिन्सन या दोघांच्याही पुढे गेला आहे. ॲटकिन्सनही लॉर्ड्सवर आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने ११८ धावा केल्या.
लॉर्ड्सवर आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक करणारे खेळाडू
स्टुअर्ट ब्रॉड वि. पाकिस्तान – १६९ धावा
गुब्बी एलन वि न्यूझीलंड – १२२
बर्नार्ड ज्युलियन (वेस्ट इंडिज वि इंग्लंड) – १२१ धावा
गस अॅटकिन्सन वि श्रीलंका – ११८ धावा
के रे इलिंगवर्थ वि वेस्टइंडिज – ११३ धावा
अजित आगरकर (भारत वि इंग्लंड) – १०९ धावा