नवी दिल्ली : कुस्तीगिरांच्या आंदोलनामुळे गेले चार महिने देशातील कुस्ती स्पर्धा आणि सराव शिबिरे थांबली आहेत. मला फाशी द्या, पण कुस्ती थांबवू नका, असे वक्तव्य भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सोमवारी केले.

ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करताना देशातील आघाडीचे कुस्तीगीर दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. कुस्तीगिरांच्या आंदोलनाला विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींकडून पाठिंबा मिळत आहे. दिल्ली पोलिसांनाही अखेर ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला आहे. अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांनंतर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध एक गुन्हा, तर लैंगिक शोषणाशी संबंधित प्रौढ तक्रारदारांच्या तक्रारींची तपासणी करण्यासाठी दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, हा तपास योग्य दिशेने सुरू आहे, हे पटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे कुस्तीगिरांनी स्पष्ट केले आहे. परंतु त्यांच्या आंदोलनामुळे कुस्तीचे नुकसान होत असल्याचे विधान ब्रिजभूषण यांनी केले.

‘‘गेल्या चार महिन्यांपासून कुस्ती पूर्णपणे थांबलेली आहे. मला फाशी द्या; पण कुस्ती थांबवू नका. युवा कुस्तीगिरांच्या भविष्याशी खेळू नका. कॅडेट राष्ट्रीय स्पर्धा होऊ द्या. ही स्पर्धा महाराष्ट्र, तमिळनाडू, त्रिपुरा किंवा अन्य कुठे होतात याने फरक पडत नाही. मात्र, कुस्ती थांबायला नको,’’ असे ब्रिजभूषण म्हणाले.

‘‘कॅडेट, कनिष्ठ आणि अन्य राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्याचे मी आंदोलन करणारे कुस्तीगीर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना आणि सरकारला आवाहन करतो. त्यांना शक्य नसल्यास कुस्ती संघटनेकडून या स्पर्धाचे आयोजन केले जाऊ शकते,’’ असेही ब्रिजभूषण म्हणाले.

अजून अटक का नाही? – सिद्धू

ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ या अजामीनपात्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी त्यांना अजून अटक का झालेली नाही? असा प्रश्न माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी उपस्थित केला. ‘‘योग्य पाऊल काय हे माहीत असूनही ते न उचलणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात इतका वेळ का लावला? तसेच गुन्हा नोंदवताना त्यात नक्की काय म्हटले आहे, हे जाहीर न करणे यामुळे अनेक शंका उपस्थित होतात. आरोपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही गोष्टी लपवल्या जात आहेत का? पोक्सो कायद्यांतर्गत नोंदवले जाणारे गुन्हे हे अजामीनपात्र असतात. मात्र, (ब्रिजभूषण यांना) अजून अटक का झालेली नाही?’’ असा सवाल सिद्धू यांनी उपस्थित केला.