Harbhajan Singh recalls Sreesanth’s daughter confronting him: आयपीएलच्या स्पर्धेतील सर्वात मोठा वाद म्हणजे हरभजन सिंगने सामन्यादरम्यान श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. भरमैदानात सर्वांसमोर रागाच्या भरात हरभजनने श्रीसंतला मारलं होतं. ही घटना संपूर्ण क्रिकेट जगतात वाऱ्यासारखी पसरली होती आणि त्यामुळे हरभजनवर आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. यानंतर हरभजनने अनेकदा श्रीसंतची याबाबत माफी मागितली. पण श्रीसंतची लेक हरभजनला जे वाक्य म्हणाली होती, जे ऐकून त्याच्या काळजाचं पाणी झालं होतं.
अलीकडेच, हरभजन सिंग रविचंद्रन अश्विनच्या कुट्टी स्टोरीज विथ अॅश या युट्युब चॅनेलकरता मुलाखतीसाठी पोहोचला होता. या मुलाखतीत त्याने त्याच्या कारकिर्दीबाबत चर्चा केली, काही घटना सांगितल्या आणि मजेशीर प्रसंगही सांगितले. पण आयपीएलमध्ये श्रीसंतसह झालेल्या वादाचा उल्लेख करताना हरभजन गहिवरला होता. या घटनेचा उल्लेख करत ही घटना आपल्या कारकिर्दीतून काढून टाकू इच्छितो असं त्याने सांगितलं.
२००८ च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना, हरभजनने एका सामन्याच्या शेवटी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या श्रीसंतला कानाखाली लगावली होती. यानंतर, बीसीसीआयने हरभजनला उर्वरित सामन्यांसाठी निलंबित केले, परंतु इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही ही घटना हरभजनच्या तशीच डोक्यात आहे, ज्यात त्याने पूर्णपणे स्वत:ची चूक असल्याचं सांगितलं.
आर अश्विनच्या यूट्यूब चॅनलवरील ‘कुट्टी स्टोरीज’ या शोमध्ये बोलताना, हरभजनला विचारण्यात आलं की त्याला त्याच्या आयुष्यातील कोणती घटना पुसून टाकायची आहे का? याचं उत्तर देताना तो म्हणाला, “माझ्या आयुष्यात मला एक गोष्ट बदलायची आहे ती म्हणजे श्रीसंतसह घडलेली घटना. मला ती घटना माझ्या कारकिर्दीतून काढून टाकायची आहे. ही अशी घटना आहे जी मी मला बदलायची आहे. मैदानावर तेव्हा जे घडलं ते चुकीचं होतं आणि मी जे केलं ते करायला नको होतं.”
पुढे बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “मी २०० वेळा माफी मागितली. त्या घटनेनंतर अनेक वर्षे मी प्रत्येक प्रसंगी किंवा स्टेजवर माफी मागत आलो आहे. ती एक चूक होती. आपण सर्वजण चुका करतो आणि अशा चुका पुन्हा कधीही न करण्याची आशा करतो आणि प्रयत्न करतो.”
“मला सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटलं, जेव्हा या घटनेच्या अनेक वर्षांनंतर मी श्रीसंतच्या लेकीशी प्रेमाने बोलत होतो आणि तितक्यात ती म्हणाली, ‘मला तुमच्याशी बोलायचं नाही. तुम्ही माझ्या बाबांना मारलं.’ ते वाक्य ऐकून माझ्या काळजाचं पाणी झालं आणि अक्षरश: मला रडू येत होतं. तिच्या बाबांना मारणारा माणूस याच नजरेने ती पाहत होती. मी अजूनही त्याच्या मुलीची माफी मागतो कारण, मी ती घटनाही बदलू शकत नाहीये आणि तिचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकत नाहीये,” असं हरभजनने सांगितलं.
गेल्या काही वर्षांत, श्रीसंत आणि हरभजन दोघांनी हा वाद बाजूला सारला आणि त्यांच्यातील मैत्री कायम आहे. पुढील काही वर्षे हे दोघे भारतासाठी एकत्र खेळले आणि २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचाही भाग होते.