Pakistan Haris Rauf Creates History: पाकिस्तानला टी-२० तिरंगी मालिकेतील अफगाणिस्तानविरूद्ध सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पण या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजाने मात्र उत्कृष्ट फलंदाजी करत मोठा विक्रम आपल्या नावे केला. अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर जिथे पाकिस्तानचे फलंदाज टिकू शकले नाहीत. तिथे हारिस रौफने वादळी फटकेबाजी करत मोठी कामगिरी केली आहे.

हारिस रौफने अफगाणिस्तानविरूद्ध स्फोटक फलंदाजी करत इतिहास घडवला. १० व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रौफने फक्त १६ चेंडूत ३४ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने ४ गगनचुंबी षटकार लगावले आणि आपल्या धमाकेदार फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केलं.

हरिस रौफची ही खेळी पाकिस्तान क्रिकेट इतिहासात १० व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोणत्याही फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. यापूर्वी हा विक्रम वेगवान गोलंदाज वहाब रियाझच्या नावावर होता, ज्याने १० व्या क्रमांकावर खेळताना २४ धावा केल्या होत्या. रौफने केवळ हा विक्रम मोडला नाही तर आपल्या आक्रमक खेळीने संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रौफची नाबाद ३४ धावांची खेळी ही पूर्ण-सदस्य राष्ट्रांमधील टी-२० क्रिकेटमध्ये १० व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने केलेली संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या यादीत झिम्बाब्वेच्या फराज अक्रमचाही समावेश आहे, ज्याने १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३४ धावा केल्या होत्या.

हरिस रौफने त्याच्या धमाकेदार खेळीदरम्यान चार षटकार लगावले. तो आता टी-२० मध्ये १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका डावात सर्वाधिक षटकार लगावणारा १०वा फलंदाज बनला आहे. एकूण चार फलंदाजांनी हे यश मिळवले आहे, परंतु रौफ हा कसोटी खेळणाऱ्या देशाकडून हा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. वेस्ट इंडिजचा अकील हुसेन हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्याने २०२२ मध्ये ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे इंग्लंडविरुद्ध ४ षटकार मारले होते.

रौफच्या या खेळीमुळे पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. अफगाणिस्तानच्या १६९ धावांच्या प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १५१ धावाच करू शकला.

अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी, कर्णधार रशीद खान, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या सामन्यात हरिस रौफने फलंदाजीत योगदान दिले असेल पण चेंडूने तो प्रभावी कामगिरी करू शकला नाही. रौफने ३ षटकं टाकली पण एकही विकेट घेऊ शकला नाही. यादरम्यान, त्याने १२.७० च्या इकॉनॉमी रेटने ३८ धावा दिल्या. पाकिस्तानकडून फहीम अश्रफने सर्वाधिक बळी घेतले. फहीमने ४ षटकांत २७ धावा देत ४ बळी घेतले.