पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार; पंजाबी गायक आणि अभिनेता अॅमी विर्क मुख्य भूमिकेत
‘भाग मिल्खा भाग’, ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’, ‘एम. एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’, ‘मेरी कोम’ अशा भारतीय क्रीडापटूंच्या आयुष्यांवर बनलेल्या चित्रपटांच्या या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, मेरी कोम यांच्या तुलनेत हा खेळाडू वयाने आणि अनुभवाने अजून बराच लहान आहे. पंजाबच्या २१ वर्षीय हॉकीपटूची कारकीर्द अवघ्या तीनेक वर्षांची आहे, तरीही त्याच्यावर चित्रपट येत असल्याने अनेकांच्या भुवया नक्की उंचावल्या असतील. पण मूर्ती लहान कीर्ती महान ही म्हण या खेळाडूला तंतोतंत लागू होते. २०१६मध्ये लखनौ येथे या खेळाडूने नेतृत्वाची धुरा सांभाळताना भारताला २० वर्षांनंतर कनिष्ठ विश्वचषक जिंकून दिला होता. हरजीत सिंग तुली असे या विश्वविजेत्या कर्णधाराचे नाव. इतक्या लहान वयात एखाद्या भारतीय खेळाडूचा चरित्रपट बनण्याची ही पहिलीच वेळ असेल. पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता अॅमी विर्क हा चरित्रपट घेऊन येत आहे. ‘हरजिता’ असे या चरित्रपटाचे नाव असून १८ मे २०१८ मध्ये तो प्रदर्शित होणार आहे.
‘‘मी कोलकाता येथे असताना अॅमी विर्क यांचा फोन आला. त्या वेळी कुणी तरी आपली गंमत करत असल्याचे मला वाटते. तुझ्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा आहे, असे त्यांनी मला सांगितले. त्या वेळी खरेच आपली कोणी तरी फिरकी घेत आहे, याची खात्री झाली. नाहीतर ऐवढा मोठा व्यक्ती आपल्याला का फोन करेल? पण विर्क यांचा वारंवार फोन येत राहिला. त्यानंतर मला विश्वास पटला. तो क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद होता,’’ असे हरजित सिंगने सांगितले. मुंबईत नुकत्याच झालेल्या बॉम्बे सुवर्णचषक अखिल भारतीय हॉकी स्पध्रेत हरजितने प्रतिनिधित्व केलेल्या भारत पेट्रोलियन कॉर्पोरेशन लिमिटेड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील खेडेगावातून ते कनिष्ठ विश्वविजेत्या संघाचा कर्णधार असा हरजितचा प्रवास अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. हरजितचे वडील रामपाल सिंग ट्रकचालक आहेत. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. हरजितच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की त्याला घरच्यांनी हॉकी सोडण्यास सांगितले होते. मात्र हरजितने जिद्दीने त्यांचे मन वळवले. हॉकी इंडिया लीगने हरजितच्या आयुष्याला कलाटणी दिली. २०१५च्या त्या स्पध्रेत उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याला गौरवण्यात आले आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
‘‘ते वर्ष आयुष्याला नव्या वळणावर घेऊन येणारे ठरले. आर्थिक परिस्थितीमुळे घरच्यांकडून हॉकी सोडण्यासाठी सांगण्यात येत होते, त्याच क्षणी मी जिद्दीने खेळ करत हॉकी लीगमध्ये उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला. त्या पुरस्कारातून मिळालेल्या रकमेने घरातील अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यानंतर कनिष्ठ संघासाठी निवड, कर्णधारपद आणि जेतेपद या प्रवासाकडे मागे वळून पाहताना मलाही प्रेरणा मिळते,’’ असे हरजितने सांगितले.
चित्रपटाचे चित्रीकरण प्रत्यक्ष पाहिले का, या प्रश्नावर त्याने त्वरित हो उत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘कोलकाताहून आम्ही ऑस्ट्रेलियात एका स्पध्रेसाठी गेलो. त्या कालावधीत विर्क यांनी चित्रीकरण सुरू केले होते. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर १५ दिवसांच्या विश्रांतीत मीही प्रत्यक्ष चित्रीकरण होत असलेल्या ठिकाणी गेलो. स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या घटना मोठय़ा पडद्यावर प्रसारित करण्यासाठी चित्रित होत असतानाचा अनुभव शहारा आणणारा होता. हा चित्रपट पंजाबी भाषेत असला तरी आशा करतो हिंदीतही तो प्रदर्शित केला जाईल.’’