‘शफालीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यातून तिचा आत्मविश्वास लक्षात आला. माझ्या मनाने कौल दिला आणि मी तिला गोलंदाजी केली. एक षटक देऊन बघूया असा मी विचार केला. तिने याआधी खूप गोलंदाजी केली नाहीये पण आजचा दिवस तिचा होता. मला संधी दिली तर १० षटकंही टाकेन असं ती म्हणाली होती. तिने माझा आणि संघाचा विश्वास सार्थ ठरवला. सेमी फायनलच्या वेळी ती संघात आली तेव्हा आम्ही तिला गोलंदाजीसंदर्भात कल्पना दिली होती. ती अतिशय सकारात्मक आहे. तिने ज्या पद्धतीने जबाबदारी हाताळली तिला सलाम आहे’, असं विश्वविजेत्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं. प्रतिका रावळला बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत झालेल्या दुखापतीमुळे शफाली वर्माला संधी मिळाली. फायनलच्या मुकाबल्यात ८७ धावा आणि २ विकेट्ससह शफालीने संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

हरमनप्रीतने पुढे सांगितलं, ‘चाहत्यांचा आवाजी प्रतिसाद आमच्यासाठी भारावून टाकणारा होता. त्यांचा पाठिंबा संपूर्ण स्पर्धेत अतिशय मोलाचा ठरला. स्पर्धेदरम्यान आम्ही तीन सामने हरलो. पण चाहत्यांनी विश्वास ठेवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीतही आम्ही स्वत:वर विश्वास ठेवण्याबाबत बोललो. गोष्टी बदलायच्या असतील तर काहीतरी खास करावं लागेल हे लक्षात आलं. या विजयात संघातल्या प्रत्येकीचं योगदान आहे. सपोर्ट स्टाफची प्रचंड मेहनत आहे’.

‘आजची खेळपट्टी ऑस्ट्रेलियाच्या सामन्यापेक्षा वेगळी होती. फायनलमध्ये दडपण जास्त असतं. त्यामुळे २९८ धावसंख्या पुरेशी आहे याचा आम्हाला विश्वास होता. दक्षिण आफ्रिकेला श्रेय द्यायला हवं. त्यांनी चांगली फलंदाजी केली. शेवटच्या षटकांमध्ये त्यांची गडबड झाली. त्याचा आम्ही फायदा उचलला. दीप्तीने अतिशय मोक्याच्या क्षणी विकेट्स पटकावल्या. प्रत्येक वर्ल्डकपनंतर आम्ही चर्चा करायचो की आपलं कुठे चुकतंय. गेले दोन वर्ष अमोल सर आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. मोठ्या स्पर्धेत तुम्हाला विशेष अशी कामगिरी करावी लागेल तरच विश्वचषक पटकावता येईल असं ते म्हणाले. मुलींनी तेच करून दाखवलं. बीसीसीआयचे प्रयत्नही महत्त्वाचे आहेत. सपोर्ट स्टाफने अथक मेहनत घेतली आहे. ही एक नवी सुरुवात आहे. यापुढे आपण जेतेपदं जिंकत जाऊ. जेतेपदं पटकावण्याची सवय लावून घ्यायची आहे. सातत्याने चांगला खेळ करत जिंकायचं आहे’, असं हरमनप्रीतने सांगितलं.