Harmanpreet Kaur Press Conference Ahead of INDW vs SAW Final: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ महिला विश्चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. वर्ल्डकपमधील अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये खेळवला जाणार आहे. याफायनलपूर्वी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर हिने उपांत्य सामन्यात संघ जिंकताच फार भावुक होत रडताना दिसली होती, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
उपांत्य सामन्यात टीम इंडियाने ७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. जेमिमा रॉड्रीग्जने ११९ धावांची शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. तर हरमनप्रीत कौरने ८९ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि जेमिमासह १६८ धावांची मॅचविनिंग भागीदारी रचली. भारताने ३३९ धावांचं विश्वविक्रमी लक्ष्य गाठत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
भारताला विजयासाठी शेवटच्या २ षटकांमध्ये ९ धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर अमनजोत कौरने चौकार लगावला आणि एकच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. तर डगआऊटमध्ये हरमनप्रीत कौर प्रचंड इमोशनल झालेली दिसली. त्यानंतर पुढच्या चेंडूवर अमनजोतने मोठा फटका मारला, पण चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडला आणि २ धावा काढल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत भारताचा विजय निश्चित होताच हरमनप्रीत कौरने विजयाचा आनंद साजरा केला.
हरमनप्रीत कौर फायनलपूर्वी पत्रकार परिषदेत काय म्हणाली?
भारतीय संघ जिंकताच हरमनप्रीत कौरने कोचला मिठी मारून रडताना दिसली. हरमन या विजयानंतर खूप भावूक झालेली पाहायला मिळाली. हरमनच्यी नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अनेक चढ-उतार पाहिले, पण अखेरीस विजयाची रेषा पार करत भारताने फायनल गाठल्याचे पाहताच हरमनच्या अश्रूंचा बांध फुटला.
पत्रकार परिषदेत हरमनप्रीतला याबाबत प्रश्न विचारताच उत्तर देताना ती म्हणाली, “मी खूप भावनिक आहे; मी खूप वेळा भावुक होऊन रडते. मी फक्त सामना जिंकल्यावर किंवा पराभूत झाल्यावरच रडत नाही तर छोट्या छोट्या प्रसंगांच्या वेळेसही भावुक होते. जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो तेव्हाही माझ्या डोळ्यात पाणी येतं. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं आणि मानसिकदृष्ट्या आपण त्यांच्यापेक्षा जास्त मजबूत आहोत हे दाखवणं, खूप खास होतं. त्या दिवसापेक्षा मोठं किंवा अधिक खास काहीच नव्हतं.”
“अशा दिवसांचा अनुभव फार वेळा येत नाही, ज्या दिवशी केवळ क्रिकेटचं नव्हे तर तिकिटं मिळवण्याचंही दडपण असतं. या विश्वचषकानंतर, आणि विशेषत: जर आम्ही विजेते ठरलो, तर बदल फक्त भारतातच नव्हे तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसतील, अशी माझी आशा आहे,” असंही हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली.
