Harmanpreet Kaur Touches Coach Amol Muzumdar feet: भारतीय महिला संघाने प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषकांचं जेतेपद पटकावलं आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला गेला. पावसामुळे २ तास उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने सुरूवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला आणि अखेरीस ५२ धावांनी मोठा विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली आणि कोच अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.

भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करत या विश्वचषक विजयात मोठं योगदान दिलं. भारताकडून या सामन्यात दीप्ती शर्माने ५ विकेट्स तर नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर शफाली वर्मा व स्मृती मानधना हिने १०४ धावांची भागीदारी केली. तर शफालीने २ विकेट्स घेत सामन्याचा रोख बदलला. अमनज्योत कौरने उत्कृष्ट झेल टिपला. याशिवाय पडद्यामागील कोचिंग स्टाफ व सपोर्ट स्टाफनेही मोठी भूमिका बजावली.

२०२३ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव असलेल्या अमोल मुझुमदार यांनी भारताच्या महिला संघाचे कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून संघाला घडवत आज ते भारताच्या विश्वचषक विजेत्या महिला संघाचे कोच झाले आहेत. विश्वचषकाच्या गट टप्प्यात इंग्लंडविरूद्ध ४ धावांनी भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर कोच अमोल मुझुमदार यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना खडेबोल सुनावले. यानंतर भारताने सलग तीन सामने जिंकत हे जेतेपद नावे केलं.

वर्ल्ड चॅम्पियन होताच हरमनप्रीत कौरच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं

भारतीय संघाच्या खेळाडूंबरोबरच कोच अमोल मुझुमदार व कोचिंग स्टाफचा संघाला मिळणारा सततचा पाठिंबा आणि त्यांचं योगदानही या विश्वचषक विजयात विसरून चालणार नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही या सर्व गोष्टी लक्षात ठेवत अनोख्या पद्धतीने मैदानावर कोचचे आभार मानले. हरमनने विजयानंतर कोच अमोल मुझुमदार यांची भेट घेण्यापूर्वी त्यांचे पाय धरत त्यांच्या पाया पडली आणि त्यांना मिठी मारत भावुक झालेली पाहायला मिळाली. तर संघाने विश्वचषक जेतेपद पटकावल्यानंतर कोच अमोल मुझुमदारही भावुक झाले होते.

हरमनप्रीत कौरने कोच अमोल मुझुमदार यांच्याप्रति केलेल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. हरमनप्रीत कौरचं चाहते कौतुक करताना दिसत आहेत. याशिवाय विश्वचषक स्पर्धेत आणि विशेषत: अंतिम सामन्यात हरमनने उत्कृष्टरितीने संघाचं नेतृत्त्व केलं.