भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीत अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या संघाने अखेरच्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान खेळाडूंवर आपला दबाव कायम ठेवत संघाला विजयापासून रोखलं. भारताने इंग्लंडला दुसऱ्या डावात १९२ धावांवर सर्वबाद केल. पण इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज फेल ठरले. पण मैदानावरील भारतीय खेळाडूंच्या एका कृतीमुळे इंग्लंडने भारताला जिंकू द्यायचं नाही असा निर्धार केला आणि शानदार विजय मिळवला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे २३ जुलैपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हन जाहीर करत त्यात नव्या खेळाडूला संधी दिली आहे. दरम्यान चौथ्या कसोटीपूर्वी हॅरी ब्रूकने पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या एका घटनेमुळे इंग्लंडचा संघामध्ये विजयाची आग पेटली आणि त्याने अखेरीस भारताला पराभूत करत आपला बदला घेतला.
लॉर्ड्स कसोटीत दोन्ही संघांमध्ये मैदानात आपण शाब्दिक बाचबाची पाहायला मिळाली होती. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळाडूंमधील वादासाठी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने भारताला जबाबदार धरले. तो म्हणाला की इंग्लंड संघ नेहमीच खेळाच्या भावनेनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो. पण भारतीय खेळाडूंनी यजमान संघाला उकसवलं.
लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांना चिडवलं, यानंतर इंग्लंडने चोख उत्तर देण्याचा निर्णय घेतला. मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत ब्रूकने हे विधान केलं. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरला तेव्हा टीम इंडिया आणि जॅक क्रॉली-बेन डकेट यांच्यात वादावादी पाहायला मिळाली होती, या घटनेबाबत तो बोलत होता.
ब्रूक म्हणाला की, तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या षटकात भारतीय खेळाडूंनी क्रॉली आणि डकेटला ज्या पद्धतीने स्लेज केलं ते पाहून इंग्लिश संघाने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी बुमराहने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिलं षटक टाकलं. दिवसाच्या अखेरीस एकचं षटक झालं पाहिजे यासाठी क्रॉली मुद्दाम वेळ घालवताना दिसला. भारताचा कर्णधार शुबमन गिलने यावर संतप्त प्रतिक्रिया देत वाद घातला होता.
हॅरी ब्रूक या घटनेबाबत म्हणाला, “आम्ही पाहिलं त्यांनी कशाप्रकारे क्रॉली आणि डकेटला घेरून स्लेज केलं होतं. म्हणून आम्हीही छोटीशी चर्चा केली आणि ठरवलं की आपण एक संघ आहोत, त्यामुळे आपण एकत्र येऊन त्यांना उत्तर दिलं पाहिजे. आम्ही खेळभावनेने शक्य तितकं खेळण्याचा प्रयत्न करतो. पण बुमराहच्या षटकात आम्ही पाहिलं की ते डकेट आणि क्रॉलीला कशाप्रकारे लक्ष्य करत होते. आम्ही ते पाहिलं आणि ठरवलं की त्यांना उत्तर देण्याची हीच वेळ आहे.”
लॉर्ड्स कसोटीतील इंग्लंडच्या विजयानंतर यजमान संघ कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. भारताला मालिका आपल्या नावे करायची असेल तर मँचेस्टर कसोटी महत्त्वाची असणार आहे.