Harry Brook Scoop Shot Goes Viral: क्रिकेट सामन्यांमध्ये फलंदाजी करताना खेळाडू अनेकदा एकापेक्षा एक कमालीचे फटके खेळताना दिसतात. स्कूप, फ्लिक, स्वीप शॉट आपण पाहिलेत. काही वेळेला फलंदाज मैदानावर पडूनही कमालीचे फटके खेळतात. ऋषभ पंतचे अनेक चौकार, षटकार तर आपण पाहिले आहेत. त्याचप्रमाणे हॅरी ब्रूकने एक विचित्र शॉट खेळला आहे. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

श्रीलंकेचा उत्कृष्ट खेळाडू तिलकरत्ने दिलशानचा स्कूप शॉट तर क्रिकेटप्रेमींच्या लक्षात असेलच. तिलकरत्ने दिलशान फलंदाजी करताना स्कूप शॉटमुळे बऱ्याच धावा करत असे. त्यामुळे या शॉटला दिलस्कूप शॉट देखील म्हटलं जातं.

आता द हंड्रेड स्पर्धेत खेळताना हॅरी ब्रूकने त्याच्यासारखाच कमालीचा स्कूप शॉट खेळला आहे. पण हा फटका खेळल्यानंतर ब्रूक स्वत:ही चकित झालेलं पाहायला मिळालं. पण ब्रूकचा हा स्कूप इतका कमाल होता की दिलशानचा तो शॉट सगळे विसरतील.

द हंड्रेड स्पर्धेतील १४ वा सामना १५ ऑगस्ट २०२५ रोजी लीड्समध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि बर्मिंगहम फिनिक्स यांच्यात खेळला गेला. जिथे बर्मिंगहमचा वेगवान गोलंदाज टिम साउथीने गुड लेंग्थवरून चेंडू टाकला आणि तो टप्पा पडून ब्रूकच्या शरीराजवळ गेला. ज्यामध्ये ब्रूकने मागच्या बाजूला वाकत एक कमालीचा स्कूप खेळत विकेटकिपरच्या डोक्यावरून जबरदस्त षटकार लगावला. सर्वच जण त्याचा हा शॉट पाहून अवाक् झाले होते.

सामन्यादरम्यान, हॅरी ब्रूकने नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १४ चेंडूंत २२१.४२ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ३१ धावा केल्या. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि दोन कमालीचे षटकार पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात टिम साउदीने त्याच्या संघ बर्मिंगहम फिनिक्ससाठी एकूण १० चेंडूंत २३ धावा देत एक विकेट घेतली.

हॅरी ब्रूकने भारताविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात खेळताना देखील असे काही फटके खेळले होते. ऋषभ पंतप्रमाणे गुडघ्यावर बसून किंवा खाली वाकून त्याने काही फटके खेळले होते, जे चौकार-षटाकारसाठी गेले होते. दरम्यान असाच मोठा फटका खेळण्याच्या नादात ब्रूक भारताविरूद्ध अखेरच्या कसोटीत बाद झाला होता. यानंतर सामना भारताने आपल्या बाजूने वळवला आणि सिराज-प्रसिधच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विजय निश्चित केला.