Harshit Rana breaks a bail with fiery delivery Video: सध्या दिल्ली प्रीमियर लीगचे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये आपल्या आक्रमक गोलंदाजीसाठी आणि सेलिब्रेशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या हर्षित राणाचा देखील समावेश आहे. नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्स संघाचा कर्णधार असलेल्या हर्षित राणा पुन्हा त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. पण यादरम्यान त्याने आपल्या रॉकेट चेंडूवर फलंदाजाला क्लीन बोल्ड करताना बेल्सचे तुकडे केले आहेत.
सोमवारी झालेल्या डीपीएलच्या सामन्यादरम्यान हर्षित राणाने फलंदाजाला बाद केल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमुळे पुन्हा अडचणीत आला. हर्षित राणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान त्याच्या गोलंदाजीवर बेल्सचे तुकडे झालेले पाहायला मिळाले.
डीपीएलमधील वेस्ट दिल्ली वि. नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्स यांच्यातील सामन्यात वेस्ट दिल्लीचा संंघ १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. दरम्यान गोलंदाजी करताना हर्षित राणाने प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज आयुष दोसेजा याला त्रिफळाचीत करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. हर्षितच्या भेदक चेंडूने बेल्स फक्त उडवले नाहीतर त्या बेल्सचे तुकडे झालेले व्हीडिओमध्ये पाहायला मिळालं.
हर्षित राणाला आक्रमक सेलिब्रेशन पडलं महागात, ठोठावला दंड
हर्षित राणाने विकेट घेतल्यानंतर हातवारे करत ‘इथून जा’ असं सांगणारं आक्रमक सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशननंतर हर्षित राणाला दंड ठोठावण्यात आला आहे. कर्णधार असलेल्या हर्षित राणावर १० टक्के मॅच फी चा दंड आकारण्यात आला. हर्षित राणाशिवाय नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्सच्या यजस शर्मा आणि वेस्ट दिल्ली लायन्स संघाच्या क्रिश यादव यांच्यावरही त्याच सामन्यानंतर मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला.
दिल्ली प्रीमियर लीगच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल हर्षित राणाला त्याच्या मॅच फीच्या १०% दंड ठोठावण्यात आला आहे. हर्षितने त्याची चूक मान्य केल्याने औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही. डीपीएलच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, ‘हर्षित राणा यांनी कलम २.५ अंतर्गत लेव्हल १चा गुन्हा केल्याचं मान्य केलं आहे.’
आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना हर्षित राणाला दोनदा दंड ठोठावण्यात आला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती. अभिषेक पोरेलला बाद केल्यानंतर त्याने आक्रमक सेलिब्रेशन केले होते, त्यामुळे त्याला त्याच्या मॅच फीच्या १००% दंड ठोठावण्यात आला.